मुंबई : मालिका विश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. कुटुंबातील वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारत मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. दरम्यान देशमुखांच्या कुटुंबात आता लग्न सोहळ्यासोबतच नवी धमाल पाहायला मिळत आहे. लग्नाच्या गडबडीतही देशमुख परिवाराने छोटे छोटे खेळ खेळत आनंद लुटला आहे. दुसरीकडे, या कुटुंबाच्या कार्यक्रमात आशुतोष केळकरची एन्ट्री झाल्याने मालिकेत अनिरुद्ध विरुद्ध आशुतोष असा नवा सामनाही पाहायला मिळत आहे.
नेहमीसारखं संगीत खुर्ची, दमशेराज खेळणं टाळत यावेळी देशमुखांनी ‘रुमाल पाणी’ हा खेळ निवडला. या खेळात ‘आई कांचन’ विरुद्ध ‘अप्पा’ अशा टीम देखील तयार झाल्या आहेत. आता या खेळात दोन्ही टीममधून एक-एक खेळाडू असा सामना रंगणार आहे. यात आता ‘आई कांचन’ टीममधून अनिरुद्ध तर अप्पांच्या टीममधून आशुतोष केळकर यांचा आमना सामना होणार आहे.
‘रुमाल पाणी खेळत एकमेकांसमोर आल्यावर ‘मी कधीच हरत नाही, नेमही जिंकण्यासाठीच खेळतो’, असे म्हणत अनिरुद्ध आशुतोषला ललकारतो. तर, ‘मी नेहमी त्यातील आनंद लुटण्यासाठी खेळ खेळतो’, असे म्हणत अनिरुद्धला सडेतोड उत्तर देतो. खेळाच्या दरम्यान आशुतोष रुमाल पटकावण्यात यशस्वी होतो. मात्र, पाठी मागून अनिरुद्धसाठी त्याची मुलं चीअर करताना पाहून तो हातात आलेला रुमाल पुन्हा खाली टाकून तो अनिरुद्धला जिंकण्याची संधी देतो. आशुतोषच्या या कृत्याने तो खेळत हरला असेल, मात्र त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.
आशुतोष आणि अनिरुद्धच्या या पडद्यावरील सामन्यावर ‘अनिरुद्ध’ साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘BABA YOU have to WIN, खरच प्रत्येकाला आपला बाबा जिंकावा असच वाटत असतं, प्रत्येकाचा बाबा त्याच्यासाठी हिरोच असतो, ईशा जेंव्हा ओरढून तिच्या बाबांना असं म्हणते की तुम्ही जिंकायलाच पाहिजे, माझ्या काळजाचा ठोका चुकला, वाटलं या लेकरांसाठी आपल्याला जिंकायला पाहिजे, या लेकरांसाठी आयुष्य जगायला पाहिजे, या लेकरांसाठी प्रयत्न करायला पाहिजे, अनिरुद्ध देशमुख मध्ये 100 दूर्गुण असतील, असतील नाही आहेतच, पण एक महत्त्वाचा, चांगला, गुण त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे अनिरुद्ध देशमुख चांगला बाबा होण्याचा प्रयत्न करत असतो. सतत, त्याच्या मुलांसाठी काही पण, अनिरुद्ध देशमुख शेवटी मुलांसाठी काहीतरी चांगलं करून जाईल, असं सारखं मला वाटतं.’
‘या रुमाल पाणी खेळामध्ये आशुतोष केळकर अनिरुद्ध देशमुखला जिंकण्यासाठी मदत करतो, तो अतिशय चांगला आणि सज्जन माणूस आहे, त्याला अनिरुद्धला हरवायचं आहे, पण ईशाचा बाबा हरायला नको असं त्याला वाटतं आणि तो रुमाल सोडून देतो. खरंच प्रत्येकाचा बाबा जिंकला पाहिजे, बाबा जिंकला की कुटुंब जिंकतं, आईला कॉम्पिटिशन नसतं, ती जिंकलेली असते, पण म्हणून बाबा पण जिंकायला हवा. माझ्या तुमच्या बाबांसाठी खूप शुभेच्छा, त्यांनी कायम जिंकत राहावं, तुम्हा सर्वांचे बाबा कायम यशस्वी आणि आनंदी रहावेत’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मिलिंद गवळी यांची ही पोस्ट खूप चर्चेत आहे.