Anupamaa: समरनंतर आता अनुजसुद्धा ‘अनुपमा’मधून बाहेर पडणार? चर्चांवर गौरव खन्नाने सोडलं मौन
मालिकेतून या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या जाण्याच्या बातमीने चाहते नाराज झाले आहेत. या चर्चांवर आता गौरव खन्नाने मौन सोडलं आहे.
टीआरपीच्या यादीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर असलेली लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ (Anupamaa) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही मालिका त्यातील कथानकामुळे नाही तर त्यातील पात्रांमुळे चर्चेत आहे. मालिकेत समरची भूमिका साकारणारा अभिनेता पारस कलनावत याने मालिका सोडल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पारस हा कलर्स वाहिनीवरील डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ मध्ये दिसणार आहे. यानंतर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, अनुज कपाडियाची (Anuj Kapadia) भूमिका करणारा अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आता मालिकेला रामराम करणार आहे. मालिकेतून या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या जाण्याच्या बातमीने चाहते नाराज झाले आहेत. या चर्चांवर आता गौरव खन्नाने मौन सोडलं आहे.
‘अनुपमा’ या मालिकेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेशी संबंधित दररोज काही ना काही चर्चा सोशल मीडियावर होत असतात. पारस कलनावतचा करार संपुष्टात आल्याचा धक्का प्रेक्षक अजूनही पचवू शकले नाहीत. इतक्यात अनुज कपाडिया शोमधून गायब झाल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत. दरम्यान खुद्द गौरवने आता त्यावर मौन सोडलं आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी एवढंच सांगेन की मी अनुपमा या मालिकेला पूर्णपणे समर्पित आहे आणि माझा निर्माते रंजन शाही यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी या मालिकेत पूर्णपणे मग्न आहे. मी सध्या तरी कुठेही जात नाही.”
View this post on Instagram
स्क्रीन टाइम कमी करण्याच्या प्रश्नावर गौरव खन्ना म्हणाला, “जेव्हा मला या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं जात होतं, तेव्हा मला माहित होतं की प्रेक्षक नेहमी मालिकेत जे पाहतात त्यापेक्षा ही काहीतरी वेगळी भूमिका असेल. त्यामुळे अनुज कपाडियाची भूमिका लोकांमध्ये खूप प्रिय झाली. मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे आणि मला वाटतं की ही मालिका पूर्णपणे वेगळी आहे. एखाद्या अभिनेत्याला आयुष्यात एक किंवा दोनदा अशी भूमिका साकारण्याची संधी मिळते आणि त्याबद्दल मी आभारी आहे.”
गौरव खन्ना या मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका गेल्या नऊ महिन्यांपासून साकारत आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटली होती का, असा प्रश्न विचारल्यास तो म्हणाला, “अगोदरपासूनच सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या मालिकेत मध्यभागी प्रवेश करणं थोडं कठीण होतं. तरीही लोकांना मालिकेतील बाकीचे पात्र खूप आवडले होते. पण तेच प्रेम ते अनुज या भूमिकेला देतील की नाही, याबद्दल मला शंका होती. पण त्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.”