Siddharth Shukla dies | आधी ‘आनंदी’ गेली, आता ‘शिव’ही गेला, ‘बालिका वधू’च्या लाडक्या जोडीची अकाली एक्झिट
प्रत्युषा आणि सिद्धार्थ यांची घट्ट मैत्री होती. तिच्या निधनाने सिद्धार्थलाही मोठा धक्का बसला होता. प्रत्युषाच्या आठवणीत इमोशनल होताना चाहत्यांनी सिद्धार्थला अनेक वेळा पाहिलं आहे. तिच्या निधनानंतरही जन्मदिनी तो सोशल मीडियावरुन आवर्जून प्रत्युषाची आठवण काढायचा.
![Siddharth Shukla dies | आधी 'आनंदी' गेली, आता 'शिव'ही गेला, 'बालिका वधू'च्या लाडक्या जोडीची अकाली एक्झिट Siddharth Shukla dies | आधी 'आनंदी' गेली, आता 'शिव'ही गेला, 'बालिका वधू'च्या लाडक्या जोडीची अकाली एक्झिट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/02174857/Sidharth-Shukla-Pratyusha-Banerjee-.jpg?w=1280)
मुंबई : ‘बिग बॉस’ च्या 13 व्या सिझनचा विजेता आणि ‘बालिका वधू’ मालिकेतील शिवच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचं निधन झाल्याची मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. विचित्र योगायोग म्हणजे ‘बालिका वधू’मधील त्याची सहकलाकार अर्थात आनंदीची भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (Pratyusha Banerjee) हिचीही अकाली एक्झिट झाली होती. प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने वेगवेगळ्या घटनांमध्ये असा अचानक निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
प्रेक्षकांची लाडकी जोडी
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 रोजी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ‘बालिका वधू’ मालिकेत लीपनंतर आनंदीची भूमिका प्रत्युषा बॅनर्जीच्या वाट्याला आली होती. तर तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या अर्थात शिव उर्फ शिवराज शेखरच्या भूमिकेत सिद्धार्थ शुक्ला झळकला होता. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 2016 मध्ये अवघ्या 24 व्या वर्षी आनंदीने, तर पाचच वर्षात वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थनेही जगाचा निरोप घेतल्याने सर्वांच्या हृदयाला चटका लागला आहे.
प्रत्युषा आणि सिद्धार्थ यांची घट्ट मैत्री होती. तिच्या निधनाने सिद्धार्थलाही मोठा धक्का बसला होता. प्रत्युषाच्या आठवणीत इमोशनल होताना चाहत्यांनी सिद्धार्थला अनेक वेळा पाहिलं आहे. तिच्या निधनानंतरही जन्मदिनी तो सोशल मीडियावरुन आवर्जून प्रत्युषाची आठवण काढायचा.
दोन रिअॅलिटी शोमध्ये सहभागी
विशेष म्हणजे प्रत्युषा बॅनर्जीही ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाली होती. ‘बिग बॉस’च्या सातव्या सिझनमध्ये ती झळकली होती. मात्र तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. तर सिद्धार्थ ‘बिग बॉस’ च्या 13 व्या सिझनचा विजेता ठरला होता. आणखी एक योगायोग म्हणजे झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोच्या पाचव्या सिझनमध्ये प्रत्युषा बॅनर्जी सहभागी झाली होती, तर सिद्धार्थही याच शोच्या 6 व्या पर्वात दिसला होता.
सुरेखा सिक्री यांचंही निधन
बालिका वधू मालिकेत दादीसां या भूमिकेने प्रेक्षकांवरही जरब बसवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचेही काही काळापूर्वी निधन झाले. दीर्घ काळापासून आजारी असलेल्या सुरेखा सिक्री यांची 16 जुलै 2021 रोजी प्राणज्योत मालवली होती.
मनोरंजन विश्वात पदार्पण
सिद्धार्थ शुक्ला मूळ मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लूक्समुळे अनेक जण त्याचं खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.
सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.
तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर त्यांना ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.
सिद्धार्थची कारकीर्द
अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सिद्धार्थ आणि शहनाजची हिट जोडी
कलर्स या हिंदी वाहिनीवरील बिग बॉस 13 (Bigg Boss 13) या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill) यांची जोडी चांगलीच गाजली होती. या शोमध्ये दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसले होते. त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते. नुकतंच, सिद्धार्थ आणि शहनाज हे करण जौहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी स्पर्धकांसोबत धमाल मस्ती केली होती.
संबंधित बातम्या :