नवी मुंबई : आपण घराबाहेर पडल्यानंतर आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे आपल्याला माहीत नसतं. कधी काय होईल याचा भरवसा नसतो. ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आकाश चौधरी याच्याबाबतही काहीसे असंच घडलंय. रेड लाइट लागल्यामुळे आकाशची कार थांबली होती. तितक्यात पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. पेट डॉगला घेऊन मुंबईपासून दूर सुट्टी घालवण्यासाठी आकाश निघाला होता. तितक्यात त्याला अपघाताला सामोरे जावं लागलं. त्यामुळे त्याच्या मनावर मोठा आघात झाला आहे.
आकाश चौधरीने या अपघाताची माहिती मीडियाला शेअर केली आहे. मी माझ्या पेट डॉगला घेऊन सुट्टी घालवण्यासाठी निघालो होतो. मला पेट डॉग सोबत वेळ घालवायचा होता. नवी मुंबईत आम्ही रेड लाईट लागल्यामुळे थांबलो होतो. मागून एक ट्रक आला आणि त्याने जोरदार धडक दिली. माझी गाडी ड्रायव्हर चालवत होता. मी पेट डॉगसोबत बसलो होतो. ट्रकने धडक दिल्याने अचानक आम्हाला मोठा झटका लागला. त्यामुळे मला प्रचंड शॉक बसला. माझ्या मनावर आघात झाला. मी घाबरून गेलो होतो.
नशीब. मी सीटबेल्ट लावलेली होती म्हणून वाचलो. मी गाडीतून उतरलो आणि ट्रक चालकाला काय झालं विचारलं. त्यावर त्याने गाडीचा ब्रेक फेल झाल्याचं सांगितलं. माझी चूक झालीय. मला माफ करा, अशी गयावया तो करू लागला. तो गरीब माणूस होता. त्यामुळे मी त्याला काही म्हटलं नाही. विशेष म्हणजे तो गाडी ठोकल्यानंतर पळून गेला नाही. पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे मी त्याला सोडून दिलं, असं आकाश म्हणाला.
दोन मिनिटातच तिथे पोलीस आले. पोलिसांनी त्याला अटक केली. पण मी थोड्यावेळाने त्याला जाऊ दिलं. माझ्यासाठी ही घटना पूर्णपणे ट्रॉमेटाइजिंग होती. खरं तर ट्रकने कारला ठोकल्याने कारचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे मला त्यावर खूप खर्च करावा लागला. माझ्याच खिशातून मी हा पैसा खर्च केला, असंही त्याने म्हटलं आहे.
मी माझ्या चालकासोबत पुन्हा घरी गेलो. दुसरी गाडी घेऊन पुन्हा व्हॅकेशनसाठी निघालो. जेव्हा तुमच्यासोबत असं होतं तेव्हा तुमचा मूड खराब होतो. जेव्हा मी माझ्या आईला अपघाताची माहिती दिली. तेव्हा ती खूप घाबरली होती. जेव्हा मी दुसऱ्यांदा घरातून बाहेर पडलो तेव्हा ती मला वारंवार फोन करून माझ्या प्रकृतीविषयी विचारत होती. खरं सांगायचं म्हणजे लोणावळ्यातून जाताना मी थोडा घाबरून गेलोय. आता जायचं असेल तर विमानानेच जाईल. बाय रोड जाणार नाही, असंही तो म्हणाला.