गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये आत्महत्या करण्याचा विचार, बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने यांच्यासोबत खास बातचीत
मुलगी झाली हो या मालिकेमधून अचानकच किरण माने यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यानंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र अनेक दिवस रंगले होते.
मुंबई : बिग बाॅस मराठी सीजन 4 चा नुकताच फिनाले पार पडला असून अक्षय केळकर हा विजेता ठरला आहे. अक्षयला ट्रॉफीसह बक्षीस म्हणून 15 लाख 55 हजार रुपये मिळाले आहेत. यंदाचे बिग बाॅस मराठी खास ठरले. यावेळी सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी स्पर्धेक म्हणून राखी सावंत देखील सहभागी झाली होती. बिग बाॅस मराठी सीजन 4 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर विजेते झालेले स्पर्धेक अर्थात किरण माने आता साताऱ्यामध्ये दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्येच किरण माने प्रचंड चर्चेत आले होते. मुलगी झाली हो या मालिकेमधून अचानकच किरण माने यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यानंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र अनेक दिवस रंगले होते.
बिग बाॅस मराठीमुळे गेल्या काही दिवसांपासून किरण माने चर्चेत आले. विशेष म्हणजे बिग बाॅसची ट्रॉफी जरी किरण माने यांना मिळवता आली नसली तरीही त्यांनी बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम नक्कीच खेळला आहे.
बिग बाॅसच्या घरात 100 दिवस राहण्याचा एक मोठा प्रवास किरण माने यांनी पार केलाय. बिग बॉसच्या घरातील नेमका अनुभव कसा होता याविषयी टीव्ही 9 मराठी सोबत किरण माने यांनी खास बातचीत केलीय.
किरण माने म्हणाले, शंभर दिवस एका ठिकाणी थांबणे हे सोपे काम नाही. बरेच जण असं म्हणतात बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. बिग बॉसमध्ये तुमची शारीरिक, बौद्धिक सहनशीलता तपासली जाते.
सुरुवातीला ज्यावेळेस मी बिग बॉसमध्ये प्रवास सुरू केला, त्यावेळेस मला वाटले मी बिग बॉस मध्ये पुढील 25 दिवस सुद्धा टिकणार नाही. माझ्यापेक्षा निम्म्यावयाची या सीझनमध्ये मुले होती. त्यांना चॅलेंज करणे सोपे नव्हते पण मी प्रत्येकाचा अंदाज घेतला आणि मग पुढे सरकत गेलो.
शो सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मी थोडा शांत होतो. अचानक कुटुंबापासून दूर होणे हे मी अनुभवत होते. मला कधीही कुणाच्या बंधनात राहिला आवड नाही. त्यामुळे सुरुवातीला घुसमट झाली होती. 13 जानेवारीला मागील वर्षी मुलगी झाली हो ही मालिका माझ्याकडून अन्यायकारक रित्या हिरावून घेतली होती.
मालिकेच्या माध्यमातून खूप चुकीच्या पद्धतीने माझी बदनामी केली गेली. त्यानंतरचे सहा महिने खूप वाईट अनुभव आले. एक काळ असा होता की मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती. तो 13 जानेवारीचा दिवस आणि आज 10 जानेवारीला बिग बॉस शोच्या माध्यमातून तुम्हीच हसत खेळत माझी मुलाखत घेताय. याचाच अर्थ त्या गोष्टीवर मी केलेली मात आहे.
बिग बॉस शो मध्ये तेजस्विनी लोणारी यांची खूप चांगली मैत्री झाली. अत्यंत चांगली स्पर्धक होती. राखी सावंत बाहेर जगतात जरी वेगळी अभिनेत्री असली तरी माणूस म्हणून खूप हळवी आहे. मराठी कुटुंबातून आलेली ही अभिनेत्री आहे.
या बिग बॉसचा जर मी प्रथम विजेत ठरलो असतो. तर तेजस्विनी लोणारे हिच्यासोबत ही ट्रॉफी शेअर केली असती. यातून मिळालेली रक्कम ही स्वतःच्या कुटुंबासाठी आणि महामानवांच्या विकासासाठी लावली असती महामानवांच्या उद्धारासाठी नक्की इथून पुढेही काम करत राहणार असल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.