Arvind Trivedi Death | ‘रामायण’ मालिकेतील रावण काळाच्या पडद्याआड, अभिनेते अरविंद त्रिवेदींचे निधन
अरविंद त्रिवेदी यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते दीर्घ काळापासून आजारी होते, पण काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची (Ravan) भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या ‘रामायण मालिके’तील रावणाच्या व्यक्तिरेखेने नव्वदच्या दशकात त्रिवेदींनी प्रेक्षकांवर गारुड केले होते.
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अरविंद त्रिवेदी यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते दीर्घ काळापासून आजारी होते, पण काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.
‘रामायण’मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या आणखी अनेक पात्रांचेही कौतुक झाले होते. त्यांनी ‘विक्रम और वेताल’ या टीव्ही मालिकेतही काम केले होते. या मालिकेनेही छोट्या पडद्यावर बराच काळ वर्चस्व गाजवले होते.
गुजराती रंगभूमीपासून कारकिर्दीला सुरुवात
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे बंधू उपेंद्र त्रिवेदी हे देखील गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली, तिथे त्यांनी जवळपास 40 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.
निधनाच्या अफवा
कोरोना लॉकडाऊनच्या काळात रामायण ही मालिका टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. त्या काळात अरविंद त्रिवेदी आजारी असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या होत्या. अरविंद त्रिवेदींच्या मृत्यूच्या अफवा या वर्षी मे महिन्यातही उठल्या होत्या, पण त्यावेळी पुतणे कौस्तुभ यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण देत खोटे वृत्त न पसरवण्याची विनंती केली होती.
भाजपची खासदारकी
अरविंद त्रिवेदींनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2002 मध्ये त्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते.
संबंधित बातम्या :
आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारे विनोद खन्ना, राजकारणातही आजमावले नशीब!