Rasik Dave : महाभारतातील नंदाची भूमिका साकारणारे अभिनेते रसिक दवे यांचं निधन; 15 दिवसांपासून होते रुग्णालयात दाखल
Rasik Dave : रसिक दवे यांनी टीव्ही मालिका आणि नाटकांसह सिनेमातही काम केलं. 4 टाइम्स लकी, स्ट्रेट, जयसुख काका, मासूम, ईश्वर, झुठी आदी सिनेमातही त्यांनी काम केलं. प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे या त्यांच्या पत्नी होत.
मुंबई : महाभारतातील नंदाची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते रसिक दवे (rasik dave) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 65 वर्षाचे होते. त्यांची किडनी खराब झाली होती. त्यामुळे त्यांना 15 दिवस रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. मात्र, दीर्घ उपचारानंतरही त्यांचं निधन झालं. दवे यांच्या मागे पत्नी अभिनेत्री केतकी दवे (ketaki dave), मुलगी रिद्धी आणि मुलगा अभिषेक आहेत. दवे हे प्रसिद्ध टीव्ही अभिनेते होते. हिंदी आणि गुजराती रंगभूमी आणि टीव्ही शोवरील त्यांच्या भूमिका चागल्याच गाजल्या. संस्कार धरोहर अपनों की, सीआयडी, कृष्णा सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत त्यांनी काम केलं होतं. मात्र, महाभारतातील (mahabharat) नंद हीच त्यांची कायम ओळख राहिली. काही दिवसांपूर्वी केतकी दवे आणि ते नच बलिए या टीव्ही शोवर दिसले होते. निर्माते जेडी मजीठिया यांनी दवे यांच्या निधनाची पृष्टी केली आहे. जेडी आणि दवे यांनी अनेक नाटकात एकत्र काम केलं आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रसिक दवे हे डायलिसीसवर होते. त्यांना आठवड्यातून तीन वेळा रुग्णालयात डायलिसीससाठी जावे लागायचे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. 15 दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीर्घ उपचारानंतर अखेर काल रात्री 8 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. रसिक दवे हे गुजराती रंगभूमीवरील मोठं नाव होतं. त्यांनी केवळ गुजराती नाटकांमध्ये कामच केलं नाही. तर अनेक नाटकांचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली.
टीव्ही मालिकांमध्ये काम
दवे यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. संस्कार-धरोहर अपनों कीमध्ये त्यांनी काम केलं होतं. या सीरियलमध्ये त्यांनी करसनदास धनसुखलाल वैष्णव ही व्यक्तिरेखा साकारली होती. केशवगडमध्ये राहणाऱ्या एका संस्कारी आणि अज्ञाधारक मुलाची कथा या मालिकेत सांगण्यात आली होती.
लोकप्रिय मालिकेत काम
त्या आधी ते सोनी टीव्हीवरील एक महल हो सपनों का मध्ये दिसले होते. या मालिकेने एक हजार एपिसोड पूर्ण केले होते. एक हजार एपिसोड पूर्ण करणारा हा पहिला हिंदी शो होता. गुजराती उद्योजक आणि त्याची चार मुले यांच्या कथनकाभोवती फिरणारी ही मालिका होती. यात दवे यांनी शेखर ही व्यक्तिरेखा साकारली होती. टीव्हीवरील ब्योमकेश बख्शी या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी काम केलं होतं.
Prominent actor #RasikDave passed away He breathed his last in #Mumbai at 8 tonight He’s well known for his character “Nand” in #Mahabharat pic.twitter.com/TzVYLlBFOU
— Tv9 Gujarati (@tv9gujarati) July 29, 2022
सिनेमातही काम
रसिक दवे यांनी टीव्ही मालिका आणि नाटकांसह सिनेमातही काम केलं. 4 टाइम्स लकी, स्ट्रेट, जयसुख काका, मासूम, ईश्वर, झुठी आदी सिनेमातही त्यांनी काम केलं. प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे या त्यांच्या पत्नी होत. क्योंकी सांस भी कभी बहु थी आणि कल हो न हो या मालिकेतून केतकी दवे झळकल्या होत्या.