‘…हा माझा एककलमी कारेक्रम हाय भावा’, पोस्टमधल्या चुका काढणाऱ्याला किरण मानेंचा टोला
किरण माने (Kiran Mane) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत
‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेमुळे अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. राजकीय भूमिका घेतल्याने निर्मात्यांनी अचानक मालिकेतून काढलं, असं ते म्हणाले होते. तर दुसरीकडे सेटवर गैरवर्तणूक केल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असं स्पष्टीकरण मालिकेच्या निर्मात्यांकडून देण्यात आलं. सोशल मीडियावर, राजकीय स्तरावर या प्रकरणी अनेक मतमतांतरे पहायला मिळाली. आता किरण माने पुन्हा एकदा त्यांच्या या कमेंटमुळे चर्चेत आले आहेत. फेसबुकच्या पोस्टमधील व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या नेटकऱ्याला किरण मानेंनी चांगलाच टोला लगावला आहे. त्यांच्या या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरण यांनी मानदेशातल्या शाळेला नुकतीच भेट दिली. या भेटीचे फोटो त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. त्यासोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये व्याकरणाच्या चुका असल्याची कमेंट एका नेटकऱ्याने केली. (Marathi Actor)
आटपाडीच्या ‘राजारामबापू हायस्कूल’ला किरण माने यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी फुलं उधळून, निरंजन ओळावून त्यांचं स्वागत केलं. यावेळी नाट्यप्रशिक्षण शिबिरात यशस्वी सहभाग घेतलेल्यांचा सत्कार किरण यांच्या हस्ते करण्यात आला. या भेटीचे फोटो पोस्ट करताना त्यांनी शाळेतली आठवण सांगितली. ज्या जागी ते पहिल्यांदा स्टेजवर उभे राहिले, नाटकात काम केलं, त्या जागेलाही भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं. किरण मानेंनी आपल्याच अंदाजात ही पोस्ट लिहिली असता, ‘व्याकरणाच्या अनेक चुका’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. त्यावर उत्तर देत किरण यांनी लिहिलं, ‘लादलेलं व्याकरन कोलने हा एककलमी कारेक्रम हाय भावा!’
किरण मानेंनी दिलेल्या उत्तरावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्याचं पाहता नंतर संबंधित युजरने ती कमेंट डिलिट केली. किरण माने हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि सोशल मीडियावर परखड मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत ते विलास पाटील ही भूमिका साकारत होते. फेसबुकवरील पोस्टमध्ये राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून त्यांना तडकाफडकी काढल्याचा वाद निर्माण झाला होता. यावरून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.