झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी, परीचा (Myra Vaikul) निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांनी पाहिलं की नेहालादेखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जाणवतंय. पण आता नेहा आणि यशच्या या प्रेमकहाणीत परी नवा अडथळा निर्माण करणार की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण परीने यशला बाबा म्हणून स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
प्रोमोमध्ये दाखवला मालिकेतला नवा ट्विस्ट-
परीला सांभाळणारे शेजारचे बंडू काका आणि काकू हे गप्पा मारत असतात. त्याचवेळी यश हा आता परीचा बाबा होणार असल्याचं बंडू काका परीला सांगतात. त्यावेळी परी विचारते, “कोण माझे बाबा?” परीच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बंडू काका यशच्या दिशेने हात दाखवतात आणि म्हणतात, “आता परीने मस्ती केली की मी तिच्या बाबांना येऊन सांगणार.” बंडू काका यशला बाबा का म्हणतायत असा प्रश्न परीला पडतो आणि ती पुढे म्हणते, “हे माझे बाबा नाहीत. हा माझा फ्रेंड आहे. बाबा सोडून निघून जातात, म्हणून मला बाबा नकोय म्हणजे नकोय.” परी रागात तिथून निघून जाते. तिचं उत्तर ऐकून नेहा, यश आणि काका-काकूंपुढे नवा पेच निर्माण होतो.
यश आणि नेहा परीला समजावू शकतील का, परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करेल का, जर तिने स्वीकार केला नाही तर नेहा आणि यश यांना त्यांच्या प्रेमाचा बळी द्यावा लागेल का, अशा प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात मिळतील. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं तब्बल दहा वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनानं मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. प्रार्थना आणि श्रेयसची ही नवी जोडी प्रेक्षकांनाही चांगलीच आवडतेय.
संबंधित बातम्या: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ
संबंधित बातम्या: सुंदर हावभाव आणि नटखट अंदाज, ‘माझी तुझी रेशीमगाठ’मालिकेतील परीचा क्यूट अंदाज