Jaydeep Bagwadkar: आषाढी निमित्त जयदीप बगवाडकरचं नवं गाणं आलं, ‘वारी नाही रे’ गाण्यातून विठुरायाला भावनिक साद
'अक्षरा क्रिएशन्स' निर्मित या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार 'अश्विनी शेंडे' हीने लिहीले आहेत. या गाण्याचे संगीत 'श्रेयस जोशी' आणि संगीत संयोजन 'प्रणव हरिदास' यांनी केले आहे. (On the occasion of Ashadi, Jaydeep Bagwadkar's new song 'Wari Nahi Re' is out)
मुंबई : संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा प्रसिद्ध गायक जयदीप बगवाडकरनं (Jaydeep Bagwadkar) आषाढी एकादशीचं औचित्य साधत ‘वारी नाही रे‘ या गाण्यामार्फत विठुरायाला भावनिक साद घातली आहे. खरं तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही वारीचे आयोजन साध्या पद्धतीने करण्यात आलं. त्यामुळे वारीला जाणाऱ्या अनेक भक्तांचा हिरमोड झाला. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला प्रत्येक भक्ताचं मन आतुर झालंय. परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदाही वारी नाही.
‘अक्षरा क्रिएशन्स’ निर्मित या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार ‘अश्विनी शेंडे’ हीने लिहीले आहेत. या गाण्याचे संगीत ‘श्रेयस जोशी’ आणि संगीत संयोजन ‘प्रणव हरिदास’ यांनी केले आहे.
आजवर जयदीपने मराठी आणि हिंदी भाषेत अनेक गाणी गायली आहेत. तसेच त्याने अनेक रिॲलिटी शोज सुद्धा केलेत. संगीत क्षेत्रातील नामांकित दिग्गज, गायिका श्रेया घोषाल, वैशाली सामंत, बेला शेंडे तसेच गायक अवधूत गुप्ते यांच्यासोबत अनेक स्टेज शोज केले आहेत. तसेच ‘मुंबई – पुणे – मुंबई ३’ या सिनेमातील प्रसिद्ध गाणं ‘कुणी येणारं गं’ या गाण्याचे ते गायक आहेत.
गायक जयदीप बगवाडकर ‘वारी नाही रे’ या गाण्याविषयी सांगतो, ”एखादी चाल जेव्हा मनाला भिडते, तेव्हा आतून काहीतरी जाणवतं, तेच “वारी नाही रे” हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर झालं. अश्विनी शेंडे हिने त्यावर सुरेख शब्दांचा साज चढवला आणि गाणं पूर्णत्वाला आलं. तसेच या गाण्याला संगीतकार श्रेयस जोशी याची अजोड साथ लाभली. गाणं गाताना समोर फक्त वारी दिसत होती. मोकळे रस्ते, धुसरसा पाऊस आणि सा-यांच्या मुखात माऊली नाम. एक अत्यंत खोल अनुभव होता आणि नेहमी प्रमाणे विठ्ठलाने तो माझ्याकडून पूर्ण करून घेतला. मनात खूप समाधान आहे, व त्याहीपेक्षा वारी पुन्हा कधी होणार हा प्रश्न सुद्धा मनाला भेडसावत आहे. पांडुरंगा चरणी एकच प्रार्थना पुढच्या वर्षी तरी वारी व्हावी.”
संबंधित बातम्या
‘ती परत आलीये’, नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!
‘आई कुठे काय करते’चा मी मोठा चाहता! ‘अविनाश देशमुख’ साकारण्याविषयी शंतनू मोघे म्हणतात…
आर्थिक संकटात असताना बॉलिवूडनेच मदत केली, राजपाल यादवने सांगितली व्यथा!