स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेवर प्रेक्षकांकडून नेहमीच प्रेमाचा वर्षाव होत असतो. या मालिकेचं रंजक कथानक, कथानकातील विविध ट्विस्ट आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अरुंधती, अनिरुद्ध, आशुतोष, संजना, कांचन देशमुख, यश ही पात्रं आता घराघरात परिचयाची झाली आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी मालिकेतील आणखी एक अभिनेत्री म्हणजे सीमा घोगले (Seema Ghogale). सीमा या मालिकेत विमलची भूमिका साकारत आहे. मात्र तिने ही मालिका सोडल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. सीमाने आई कुठे काय करते ही मालिका सोडली असून ती लवकरच नव्या मालिकेत नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.
सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘बॉस माझी लाडाची’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच मालिकेत सीमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं समजतंय. या मालिकेतून एक हटके प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यामध्ये सीमासोबतच भाग्यश्री लिमये, रोहिणी हट्टंगडी, गिरीश ओक, आयुष संजीव, सोनल पवार यांच्याही भूमिका आहेत. या मालिकेद्वारे ऑफिसमधली धमाल प्रेमकहाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. घराची बॉस तर बायको असतेच पण जेव्हा ऑफिसची बॉसही बायको असते, तेव्हा मात्र काही खरं नाही. मिहिरची अशीच गत झाली आहे, कारण त्याची बायकोच त्याची बॉस आहे. बॉस राजेश्वरी आणि कर्मचारी मिहिर यांची ही गोष्ट आहे.
अभिनेत्रीसोबतच सीमा उत्तर नृत्यांगनादेखील आहे. तिने याआधीही काही मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सीमाचा चाहतावर्गही मोठा आहे. आई कुठे काय करते या मालिकेत सीमाने अत्यंत साधी भूमिका साकारली आहे. मात्र खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावरील फोटोंमध्ये सहज पहायला मिळतो.