‘आई कुठे काय करते’चा मी मोठा चाहता! ‘अविनाश देशमुख’ साकारण्याविषयी शंतनू मोघे म्हणतात…
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एंट्री होणार आहे.
मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एंट्री होणार आहे. मालिकेत आजवर या पात्राविषयी आपण ऐकत आलोय. पण, आता खुद्द अविनाश या देशमुखांच्या घरात दाखल होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे (Shantanu Moghe) अविनाश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शंतनू म्हणाला, ‘आई कुठे काय करते मालिकेचा मी मोठा चाहता आहे. माझ्या घरातल्या सर्वांचीच ही आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काम करायला मिळणं हे प्रचंड मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. मालिकेची टीम अतिशय भन्नाट आहे. या टीममध्ये मी जरी नवा असलो तरी मला तसं कुणी जाणवू दिलं नाही. खूप प्रेमाने माझं स्वागत झालं. आई कुठे काय करते मालिकेची ही स्वप्नवत टीम आहे. सुजाण कलाकार, उत्कृष्ट संवादलेखन आणि तितक्याच ताकदीचं दिग्दर्शन यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत.’
कोण आहे अविनाश देशमुख?
अविनाश या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं तर, 15 वर्षांपूर्वी त्याने देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. वैचारिक मतभेदांमुळेच अविनाशने हा निर्णय घेतला. मात्र, आता हसतं खेळतं कुटुंब दुभंगणार हे कळल्यावर त्याची पावलं पुन्हा एकदा घराकडे वळली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने एका छान कलाकृतीचा भाग होण्याची संधी मिळाल्याची भावना शंतनू मोघेने व्यक्त केली.
View this post on Instagram
‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या भावनिक वळणावर आली आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या नात्याची वीण उसवल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. अविनाश कुटुंबाचा आधार होईल का? त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं वळण येणार हे पुढील भागांमधून स्पष्ट होणार आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘छत्रपती शिवाजी महाराजां’ची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एंट्री घेणार आहेत. अविनाशच्या येण्याने देशमुखांच्या ‘समृद्धी’ बंगल्यात नव्या घडामोडी घडणार आहेत, तर या दरम्यान धमाल देखील पाहायला मिळणार आहे.
अविनाशच्या येण्याने बदलेल अरुंधती-अनिरुद्धचे नाते?
देशमुखांच्या घरात एकीकडे यश आणि गौरीच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे अरुंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटाची लगबग सुरु आहे. नुकतीच दोघांना घटस्फोटाची तारीख मिळाली आहे. या दिवसानंतर अरुंधती आणि अनिरुद्धचे रस्ते कायमचे वेगळे होणार आहेत. देशमुखांच्या घरात यशाच्या साखरपुड्यासाठी सगळ्या नातेवाईकांची हजेरी असणार आहे. याच साठी आता देविका आणि अविनाश ‘समृद्धी’ बंगल्यात आले आहेत.
अविनाशची मागणी ऐकून तरी अरुंधती आणि अनिरुद्ध आपापले निर्णय बदलतील अशी आशा सर्वाना वाटत आहे. अर्थात अरुंधतीने आधीच मनाशी ठाम गाठ बांधल्याने हे जवळपास अशक्य वाटत आहे. त्यमुळे अविनाशच्या येण्याने देशमुखांचे प्रश्न सुट्टीला का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Star Pravah Aai Kuthe Kay Karte update Shantanu Moghe says about Avinash Deshmukh)