तारक मेहता शोबाबत दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय, पाहा कोणाला दिला दणका?
TMKOC : दिल्ली हायकोर्टाने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या मालिकेतील अनेक कंटेंट गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. त्याचा गैरवापर होत असल्याचा मालिकेच्या निर्मात्यांचा आरोप होता. त्यावर आता कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
टीव्हीवर सर्वाधिक घरांमध्ये बघितला जाणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. ही मालिका आता इतकी लोकप्रिय झाली आहे की, अनेक जण दररोज ती बघतात. इतकंच नाही तर गेल्या १६ वर्षांपासून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या मालिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते, नीला फिल्म प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले की, शोचे शीर्षक, पात्र, चेहरे, पद्धती, संवाद आणि इतर घटक आता कायद्यानुसार संरक्षित आहेत. काही महिन्यांपूर्वी शोच्या निर्मात्यांनी आरोप केला होता की, अनेक वेबसाइट्स ‘तारक मेहता’चे पात्र, नाव आणि इमेजचा गैरवापर करत आहेत. अनेक सोशल मीडिया खाती, वेबसाइट्स आणि यूट्यूब चॅनेल याचा गैरवापर करताना दिसले आहेत. बेकायदेशीरपणे वापर करत ॲनिमेशन, डीपफेक, एआय-जनरेट केलेले फोटो आणि पात्रांशी संबंधित अश्लील सामग्री पसरवली जात आहे.
४८ तासांची मुदत
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी निर्मात्यांच्या बाजूने निकाल दिलाय. त्यांनी मालिकेशी संबधित कंटेंट युट्यूबवरून काढण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावरुन सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. ४८ तासांच्या आत आक्षेपार्ह मजकूर काढला नाही तर या सर्व लिंक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केल्या जाणार आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.
काय म्हणाले निर्माते
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले- आमच्या मालमत्तेच्या संरक्षणाचे महत्त्व ओळखल्याबद्दल आम्ही दिल्ली उच्च न्यायालयाचे आभारी आहोत. न्यायालयाच्या आदेशाने कठोर निर्णय दिलाय. एक निर्माता म्हणून माझा नेहमीच विश्वास आहे की शोच्या कथेचा लोकांच्या जीवनावर प्रभाव पडतो. या आदेशामुळे केवळ आमचे संरक्षण झाले नाही, तर शोमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचे मनोबलही उंचावले आहे.