झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी, परीचा (Myra Vaikul) निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेतील रंजक वळणं प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवतात आणि ही मालिका आता एका विलक्षण वळणावर येऊन पोहोचली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिलं की यश आणि नेहा एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात. मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र या मालिकेतून एका कलाकाराची एग्झिट होणार आहे. महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने या मालिकेला रामराम केल्याचं समजतंय.
मालिकेत यशच्या आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांची एग्झिट होणार असल्याचं कळतंय. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे त्यांच्या जागी आता एका नव्या अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे. अभिनेते प्रदीप वेलणकर हे मालिकेत मोहन जोशींची जागा घेतील, असं वृत्त आहे. जग्गू आजोबांची भूमिका आता ते साकारतील.
या मालिकेत यश नेहाला लग्नाची मागणी घालणार आहे. मात्र नेहाच्या होकारापूर्वी त्याला परीचा होकार मिळवायला लागणार आहे. हीच यशसाठी कठीण परीक्षा आहे. परी चक्क यशचा इंटरव्ह्यू घेणार आहे. मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये परी यशचा इंटरव्ह्यू घेताना दिसते. जोवर ती हो म्हणत नाही, तोवर मी काही सांगू शकत नाही, असं नेहा यशला म्हणते. त्यामुळे यशला काहीही करून परीचं मन जिंकावं लागणार आहे. त्यामुळे यश या परीक्षेत कसा पास होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा:
परीचा यशला बाबा म्हणून स्वीकार करण्यास नकार; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नवा ट्विस्ट
Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!