Kitchen Kallakar: टेलिव्हिजनच्या लोकप्रिय सासूबाईंचा किचनमध्ये कल्ला; ‘किचन कल्लाकार’चा धमाल एपिसोड
अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni), सविता मालपेकर (Savita Malpekar) आणि देवमाणूसमधील सरू आजी म्हणजेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार या किचन कल्लाकारच्या किचनमध्ये हजेरी लावणार आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. पण या आठवड्यात टेलिव्हिजनवर गाजलेल्या सासूबाई या मंचावर सज्ज होणार आहेत. अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni), सविता मालपेकर (Savita Malpekar) आणि देवमाणूसमधील सरू आजी म्हणजेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार या किचन कल्लाकारच्या किचनमध्ये हजेरी लावणार आहेत. या अभिनेत्रींनी छोटा पडदा गाजवला आहे आणि आता त्या किचनमध्ये काय कल्ला करणार हे प्रेक्षकांना पाहताना नक्कीच मजा येईल. हे एपिसोड बुधवार आणि गुरुवार रात्री 9.30 वाजता प्रसारित होतील.
कला, क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील विविध मंडळींनी याआधी या कार्यक्रमात हजेरी लावली. खवय्ये म्हटल्यावर एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. प्रशांत दामले यांची खवय्येगिरीसुद्धा या कार्यक्रमात पहायला मिळते. तर अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram हे सुद्धा वाचा
‘किचन कल्लाकार’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री गौतमी देशपांडेने हजेरी लावली होती. यावेळी गौतमीने तिच्या फजितीचा एक किस्सा सांगितला. “एकदा पीठ मळताना ते माझ्याकडून खूप पातळ झालं. मी खूप प्रयत्न केले पण ते काही नीट झालं नाही. मग मी रडत रडत आईला फोन केला की हे नीट नाही होत आहे, त्यावर आईने त्यात अजून पीठ टाकायला सांगितलं. मग मी पीठ टाकलं मग परत पाणी टाकलं आणि हा सिलसिला चालूच राहिला”, असं तिने सांगितलं. त्यावर संकर्षण मिश्कीलपणे ‘हा डेलीसोप केल्याचा परिणाम आहे’ असं म्हणाला आणि मंचावर एकच हशा पिकला.