सीता देवीच्या कपड्यांवरुन ‘त्यावेळी’ वाद का निर्माण झालेला? सरकारने रामानंद सागर यांना काय म्हटलं होतं?
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आज अखेर रामलल्ला यांची प्राण प्रतिष्ठा झाली आहे. देशभरात राममय वातावरण आहे. असंच काहीसं वातावरण काही वर्षांपूर्वी देशात होतं. तो काळ रामानंद सागर यांनी तयार केलेल्या 'रामायणा'चा टीव्ही प्रदर्शनाचा होता. पण हा कार्यक्रम प्रदर्शित होण्यापूर्वी सीता देवीच्या कपड्यांवरुन वाद निर्माण झाला होता. सरकारकडून त्यावेळी कपडे बदलण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मुंबई | 22 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज पार पडला. रामलल्ला यांच्या प्राण प्रतिष्ठाचा भव्य असा महोत्सव आज देशभरात पार पडत आहे. देशभरात मोठा उत्साह पार पडतोय. देशात रामायण माहिती नाही, असं कुणी नसेल. पण देशभरात रामायण पोहोचवण्याचं खरं श्रेय रामानंद सागर यांना जातं. त्यांच्या रामायण कार्यक्रमाने भारतीय टीव्हीचं भाग्यच बदलून टाकलं. त्या काळात रामायणाचा एक एपिसोड तयार करायला 9 लाख रुपये इतका खर्च यायचा. तर एका एपिसोडची कमाई ही जवळपास 40 लाख रुपये इतकी होती. या कार्यक्रमामुळे श्रीरामांची भूमिका साकारणाचे अभिनेते अरुण गोविल, सीता देवीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया या घराघरात पोहोचल्या होत्या. त्यांची प्रसिद्धी ही कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नव्हती. पण रामायणाचा कार्यक्रम प्रक्षेपित होण्याआधी काही वाद झाले होते. त्यापैकी एक वाद हा सीता देवीच्या कपड्यांवरुन निर्माण झाला होता.
रामानंद सागर सीताच्या वेशभूषावरुन वादात सापडले होते. याच वादामुळे कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाला दोन वर्षापेक्षा जास्त उशिर झाला. लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी याबाबत भाष्य केलं होतं. त्या काळात रामायण टेलीकास्ट करणं हा खूप मोठा मुद्दा झाला होता, असं सुनील लहरी यांनी सांगितलं होतं.
अशा कार्यक्रमांकडे किंवा टीव्ही सीरियलकडे आधीपासून खूप बारकाईने पाहीलं जातं. एक वेळ अशी आली होती की, रामानंद सागर यांच्या रामायणाला प्रदर्शित करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतच्या समितीत इंडिय ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीलादेखील सहभागी करुन घेण्यात आलं होतं. त्यावेळी रामानंद सागर यांनी ‘रामायण’चे तीन पायलेट एपिसोड शूट केले होते. त्यावेळी रिलीज करण्याबाबत सरकार खूप सतर्क होतं. सरकारकडून कार्यक्रम पाहिल्यानंतर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
सरकार नेमकं काय म्हणालं होतं?
याबाबत सुनील लहरी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली होती. “मला असं वाटत होतं की त्यांना हा कार्यक्रम टाळायचा आहे. तर दुसरीकडे रामानंद सागर हे देखील आपल्या निर्णयावर ठाम होते. मिनिस्ट्रीवाल्यांकडून सीताच्या ब्लाऊजबाबतच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांचं म्हणणं होतं की, माता सीता कट स्लीव ब्लाऊज परिधान करु शकत नाही. दूरदर्शनवाल्यांनीदेखील त्याला विरोध केला होता. त्यांनी टेलिकास्ट करायलाही मनाई केली होती”, असं सुनील लहरी यांनी सांगितलं.
यानंतर रामानंद सागर यांनी पुन्हा एकदा सीता देवीच्या वेशभूषेबाबत विचार केला. कट स्लीव ब्लाऊजला फुल स्लीव करण्यात आलं. यासह इतर काही आक्षेपांमुळे या सीरियलला प्रदर्शित करण्यास दोन वर्षापेक्षा जास्त वेळ थांबवण्यात आलं होतं.