मुंबई : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मागील पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे हे ज्युरीच्या भूमिकेतून या पर्वात देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमातील 14 लिटिल चॅम्प्स या स्पर्धेत प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत (Zee Marathi SaReGaMaPa L’il Champs new season update little musicians will seen in new season).
या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी या स्पर्धेत एलिमिनेशन होणार नाहीय. छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी देणारा हा मंच अजून एक सरप्राईज प्रेक्षकांना देणार आहे. यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही, तर वादक मित्रांमध्ये देखील काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीस येतील.
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या या नवीन पर्वात 4 छोटे वादक मित्र संगीताची साथ देताना दिसतील. यात नाशिकचा 11 वर्षांच्या जय अविनाश गांगुर्डेचा समावेश आहे, जो कोंगो तुंबा वाजवताना दिसेल. जय वयाच्या दोन वर्षापासून हे वाद्य वाजवतोय. तसंच, त्याला ‘अटल गौरव अलंकार’ हा मध्य प्रदेश सरकार पुरस्कार देखील मिळाला आहे. कोल्हापूरची तन्वी धनंजय पाटील ही वयाच्या 8 वर्षांपासून वारणा बालवाद्य वृंदमध्ये सक्रीय आहे. तिला मेंडोलिन, जलतरंग हार्मोनियम,कीबोर्ड आणि व्हायोलिन एवढी सगळी वाद्य वाजवता येतात. त्याच बरोबर ती खूप छान गाते सुद्धा. ती लिटिल चॅम्प्सच्या गाण्यांमध्ये मेंडोलिन वाजवून साथ देणार आहे.
तसंच कोल्हापूरचाच सोहम सचिन जगताप हा प्रेक्षकांना संतूर वाजवताना दिसेल. सोहम वयाच्या बाराव्या वर्षांपासून संतूर, तर तिसऱ्या वर्षांपासून बासरी शिकत आहे. औरंगाबादचा सोहम उगले हा प्रेक्षकांना कार्यक्रमात संबळ वाजवताना दिसेल, तो वयाच्या चौथ्या वर्षांपासून संबळ शिकतोय. आपण क्वचित पाहिलेली वाद्य देखील ही मुलं अगदी सहज वाजवतात.
‘छोट्यांचे मोठ्ठ स्वप्न साकारणार’ असं म्हणत खऱ्या अर्थाने सारेगमपचा मंच हा या मुलांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देतोय. सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम 24 जूनपासून ‘झी मराठी’ या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
(Zee Marathi SaReGaMaPa L’il Champs new season update little musicians will seen in new season)