साऊथच्या 4 चित्रपटांवर भारी पडला शाहिद-क्रितीचा सिनेमा; दुसऱ्या दिवशी बंपर कमाई
अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई केली असून साऊथच्या चार चित्रपटांना मात दिली आहे.
मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. रोबॉट आणि माणसाच्या नात्यावर आधारित या चित्रपटाती कथा आहे. भावना, रोमान्स आणि फॅमिली ड्रामा या सर्व गोष्टींचा भरणा या चित्रपटात आहे. हा एक साय-फाय चित्रपट असून यातील क्रिती सनॉन आणि शाहिद कपूरच्या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने क्रिती आणि शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. चित्रपटाच्या कमाईची सुरुवात धिमी झाली असली तरी दुसऱ्या दिवसाच्या कमाईच चांगली वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 6.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर आता दुसऱ्या दिवशी या कमाईच चांगली वाढ झाल्याचं पहायला मिळालं. ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 9.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. भारतातील दोन्ही दिवसांच्या कमाईचा आकडा हा 16.20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही कमाई दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चार चित्रपटांपेक्षा अधिक आहे. याशिवाय जगभरातील कमाईविषयी बोलायचं झाल्यास या चित्रपटाने पहिल्या दिवशी 14 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
View this post on Instagram
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटासोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये लाल सलाम, ईगल, लव्हर, प्रेमालु आणि अनवेषिप्पिन कांडेतुम या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र या चारही चित्रपटांच्या तुलनेत शाहिद आणि क्रितीच्या चित्रपटाने अधिक कमाई केली आहे. ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा एक रोबॉटिक चित्रपट असून यामध्ये रोमान्स आणि इमोशन्सचाही तडका आहे. चित्रपटात क्रितीने रोबॉटची भूमिका साकारली आहे. तिच्या प्रेमात शाहिद कपूर पडतो. या चित्रपटाचा बजेट जवळपास 75 कोटी रुपये इतका आहे.