शांतीवनातल्या निराधार आजी-आजोबांसोबत जुई गडकरीचं दिवाळी सेलिब्रेशन
'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरीने दिवाळीचा सण निराधार आजी-आजोबांसोबत साजरा केला. नेटकरी तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत. जुईने हा खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
आनंद इतरांसोबत वाटला तर तो द्विगुणीत होतो असं म्हणतात. अभिनेत्री जुई गडकरी या आनंदाची प्रचिती गेल्या वीस वर्षांपासून अनुभवतेय. जुई मुळची कर्जतची. एकत्र कुटुंबात वाढलेली. त्यामुळे सण कोणताही असो संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन तो जल्लोषात साजरा करतात. नातेवाईकांसोबतचे हे क्षण जुईसाठी खास आहेतच. पण जुईचं आणखी एक कुटुंब आहे जे गेले वीस वर्ष तिने अगदी घट्ट जपलं आहे. हे कुटुंब म्हणजे पनवेल इथल्या शांतीवन आश्रमातील निराधार आणि कुष्ठरोगाशी झुंज देणारे आजी-आजोबा.
कॉलेजमध्ये असल्यापासून जुई न चुकता दिवाळीचा सण या निराधार आजी-आजोबांसोबत साजरा करते. या उपक्रमात तिला तिच्या मित्रपरिवाराचाही साथ लाभते. दिवाळीच्या दिवशी जुई आणि तिचा मित्रपरिवार मिळून संपूर्ण आश्रम सजवतात. फराळ आणि गोडधोड जेवणाचा बेतही असतो. आजी आजोबांसाठी गाण्याचा कार्यक्रमही साजरा केला जातो. कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकाच्या तिकिटातून मिळालेले पैसे या आश्रमाला देणगी स्वरुपात दिले जायचे. आता बरेच जण या उपक्रमाला सढळ हस्ते हातभार लावतात. जे पैसे जमतात ते या आजी-आजोबांचं वर्षभराचं रेशन, औषधपाणी, कपडे यासाठी वापरले जातात.
View this post on Instagram
जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘शांतीवन आश्रमाशी स्वत:ला जोडून यंदा वीस वर्षे पूर्ण झाली. हा प्रवास खूपच सुंदर होता आणि शांतीवनमधल्या लोकांकडून खूप काही शिकायला मिळालं. आम्ही 1 लाख 42 हजार 500 रुपये या आश्रमात दान केले. दान केलेली ही बहुतांश रक्कम माझ्या इन्स्टाग्राम फॅमिलीकडून मिळाली. त्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते. मी फक्त माध्यम बनली आहे. तुम्ही प्रमुख डोनर आहात.’ जुईच्या या परोपकारी कार्याचं नेटकऱ्यांनीही तोंडभरून कौतुक केलं आहे.
माझ्यावर विश्वास ठेऊन मदतीचा हाच पुढे करणाऱ्या सर्वांचीच मी ऋणी आहे अशी भावना जुईने व्यक्त केली. जुईच्या या उपक्रमात आजवर कधीही खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे कॉलेजचे नवे विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होतात. जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत जुई साकारत असलेली सायली देखील अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालीय. त्यामुळे या व्यक्तिरेखासाठी जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने तातडीने होकार दिला होता.