साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अभिनेत्री प्रियामणी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आंतरधर्मीय लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुस्तफा राजशी साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून हिंदी कलाविश्वात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियामणीने 2017 मध्ये लग्न केलं. इव्हेंट मॅनेजर आणि दिग्दर्शक मुस्तफा राज याच्याशी तिने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. मात्र या लग्नानंतर दोघांनाही प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. प्रियामणीने मुस्तफाशी आंतरधर्मीय लग्न केल्याने नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. आता लग्नाच्या सात वर्षांनंतरही द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागत असल्याची तक्रार तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवली.
याविषयी ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणी म्हणाली, “माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षण मला माझ्या लोकांसोबत शेअर करायचा होता. म्हणून मी साखरपुड्याची गोड बातमी सर्वांना सांगितली. पण कोणत्या कारणासाठी माहीत नाही, माझ्यावर लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली. लव्ह जिहादचे आरोप आमच्यावर झाले. इतकंच नव्हे तर जेव्हा आमची मुलं होतील, तेव्हा ते ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होतील, अशीही टीका लोकांनी केली”




View this post on Instagram
अशा कमेंट्सचा प्रियामणीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. “मी फिल्म इंडस्ट्रीचा भाग असल्याने तुम्ही मला काहीही बोलू शकता हे मी समजू शकते. पण अशा व्यक्तीवर का आरोप करावेत, जो या सगळ्याचा भागच नाहीये? तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नाही. या कमेंट्समुळे दोन-तीन दिवस माझ्यावर खूप परिणाम झाला होता, कारण मला सतत मेसेज येत होते. आजही मी एखादी पोस्ट केली, तर दहापैकी नऊ कमेंट्स हे आमच्या धर्माविषयी किंवा जातीविषयी असतात”, अशी खंत तिने बोलून दाखवली.
“आगीत तेल ओतल्याने कोणाचंच भलं होत नाही, ही गोष्ट मला समजू लागली आहे. मला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला मला कोणतंच महत्त्वं द्यायचं नाहीये किंवा त्यांना मिळणाऱ्या एक मिनिटाच्या प्रसिद्धीला एंजॉय करू दे. हे असे लोक असतात ते कम्प्युटर किंवा फोनमागे चेहरा लपवून अशी एखादी कमेंट करतात आणि त्यावर आम्ही उत्तर द्यावं अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे अशा नकारात्मकतेला मी दुर्लक्ष करायला शिकलेय”, असं प्रियामणी म्हणाली.