मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीत ज्युनिअर नाना पाटेकर या नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध कलाकार तीर्थानंद रावने टोकाचं पाऊल उचललं. फेसबुकवर लाइव्ह करत त्याने आपला जीव संपवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तीर्थानंदचा जीव वाचवला. सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “मला खरंच जगायचं नाही. त्या महिलेच्या त्रासाने मी वैतागलो आहे. जर पोलीस वेळीच आली नसती तर कदाचित मी आज जिवंत नसतो.”
पोलिसांनी जेव्हा तीर्थानंदच्या गर्लफ्रेंडला फोन करून रुग्णालयात बोलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, “त्याला मरू द्या, मी तर तशीही त्याला सोडणार होती.” असं म्हणून तिने फोन कट केला. गर्लफ्रेंडमुळे स्वत:च्याच घरातून अनेक दिवसांपर्यंत बेघर व्हावं लागलं, असंही तीर्थानंद म्हणाला. “मी जवळपास 10 ते 12 दिवस घराबाहेर फुटपाथवर राहत होतो. तिने माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी तिच्याकडे सतत विनंती करत होतो की खटले मागे घेऊन माझी सुटका कर. मात्र ती ऐकायला तयार नव्हती. तिला माझ्या घरावर हक्क हवा आहे. माझ्याकडे ती पैशांचीही मागणी करतेय. नुकताच मी तिला जवळपास एक लाख रुपयाचा फोन खरेदी करून दिला”, असंही त्याने सांगितलं.
आपल्या प्रकृतीबाबत तो पुढे म्हणाला, “माझ्या शरीरात विष पसरलं होतं, मात्र योग्य वेळी रुग्णालयात दाखल केल्यामुळे माझे प्राण वाचू शकले. मला माझ्या कृत्याची लाज वाटते, पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्या महिलेनं माझ्याविरोधातील सर्व खटले मागे घेऊन मला या त्रासातून मुक्त करावं अशी माझी इच्छा आहे. या सगळ्या घटनांमुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीये. मी साठवलेले पैसेसुद्धा आता संपले आहेत.”
ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून प्रसिद्ध असलेला तीर्थानंद राव याने मीरा रोड इथल्या राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. फेसबुकवर लाइव्ह करत त्याने फिनाइल पिण्याचा प्रयत्न केला. या लाइव्हदरम्यान तो त्याच्या गर्लफ्रेंडवर विविध आरोप करत होता. तीर्थानंद त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.