मुंबई : ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स’ची घोषणा सोमवारी झाली. या पुरस्कार सोहळ्यात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘द काश्मीर फाइल्स’ने पटकावला. तर अनुपम खेर यांना ‘मोस्ट व्हर्सेटाइल अभिनेता’ हा पुरस्काराने गौरविण्यात आलं. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीसाठी हा पुरस्कार सोहळा खूप खास ठरला. कारण आलियाला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर रणबीरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
अभिनेता वरुण धवनने क्रिटिक्स बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार पटकावला. तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या कांतारा या चित्रपटाचा अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मालिकांच्या विभागात रुपाली गांगुलीच्या ‘अनुपमा’ने बाजी मारली.
हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने जाहीर नाराजी व्यक्त केली. सर्व मोठे पुरस्कार स्टारकिड्स घेऊन गेले, असं ती म्हणाली. घराणेशाहीच्या माफियांनी स्वकर्तृत्वावर पुढे येणाऱ्या लोकांचं करिअर उद्ध्वस्त केल्याचाही आरोप तिने केला.