‘तू तर देवमाणूस’; The Kerala Story मध्ये ISIS दहशतवाद्याची भूमिका साकारणाऱ्याला असं का म्हणाले प्रेक्षक?
यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर अभिनेता विजय कृष्णने या चित्रपटात ISIS दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे.
मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनानंतर नऊ दिवसांतच 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दमदार कमाई करतोय. यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर अभिनेता विजय कृष्णने या चित्रपटात ISIS दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रत्येकाने पहावा, असा आग्रह विजय कृष्णने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. इतकंच नव्हे तर ज्यांनी त्या परिस्थितीचा सामना केला आहे, त्यांच्याकडून मेसेज येत असल्याचं त्याने म्हटलंय.
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळमधल्या महिलांच्या खऱ्या घटनेवर आधारित असल्याचा दावा निर्माते- दिग्दर्शक करत आहेत. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना कशापद्धतीने इस्लाममध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्यानंतर ISIS या दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात अडकवलं जातं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. विपुल शाह निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेनने केलं आहे.
विजय कृष्णने या चित्रपटात इरशाक नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. जो आधी ख्रिश्चन असतो, मात्र इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तो ISIS साठी काम करू लागतो. “इरशाक हा त्याचा मार्ग भरकटला आहे. आपल्या धर्माप्रती नैतिकता विसरून त्याला असं वाटतं की सगळं त्याच्यानुसार होतंय. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला मेसेज करून सांगितलं की हे खरंय. केरळमध्ये असं खरंच घडलं आहे”, असं तो म्हणाला.
View this post on Instagram
चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी तो पुढे म्हणाला, “सोशल मीडियावर माझ्या भूमिकेमुळे माझ्यावर कौतुकासोबतच टीकासुद्धा होत होती. मात्र यात रंजक बाब म्हणजे अनेकांनी मला असं म्हटलं की, आम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर तुझा खूप राग येत होता. पण तुझी पूर्ण प्रोफाइल पाहिल्यानंतर असं वाटलं की तू देवमाणूस आहेत. हे खूपच मजेशीर आहे. माझ्या नकारात्मक भूमिकेसाठी ते माझं कौतुक करत होते. रिल आणि रिअल लाइफमधील फरक त्यांना समजू लागला आहे.”
दहशतवाद्याची भूमिका साकारण्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं, “मी असंख्य आर्टिकल्स वाचले. मी कॅलिफेट, फॅमिली मॅन यांसारखे चित्रपट आणि सीरिज पाहिले होते. ISIS विषयी अनेक माहितीपट उपलब्ध आहेत, त्यांचा मी अभ्यास केला.”