मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने फक्त देशभरातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच वादविवादांनंतर, बंदीनंतर भारतात या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अदा शर्माच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. तिने ‘द केरळ स्टोरी’मध्ये शालिनी उन्नीकृष्णन या दाक्षिणात्य तरुणीची भूमिका साकारली. नर्स होण्याचं स्वप्न पाहणारी शालिनी एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकते. त्यानंतर कसं तिचं धर्मांतर केलं जातं आणि ISIS या दहशतवादी संघटनेत तिला कसं सामील केलं जातं याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एकीकडे अदाचं कौतुक होत असताना दुसरीकडे तिला काही समस्यांचाही सामना करावा लागतोय. अदाला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे धमक्या मिळत होत्या. त्यानंतर आता एका इन्स्टाग्राम युजरने तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स लीक केले आहेत.
अदा शर्माचा फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाइन लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका इन्स्टाग्राम युजरने तिचा नंबर लीक केला आहे. इतकंच नव्हे तर संबंधित युजरने अभिनेत्रीचा नवीन नंबरसुद्धा लीक करण्याची धमकी दिली आहे. सध्या त्या युजरचा अकाऊंट डिअॅक्टिव्हेट आहे. यामुळे अदा शर्माला नवीन समस्यांचा सामना करावा लागतोय. याआधी एका मुलाखतीत दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी सांगितलं होतं की तिला धमक्या मिळत आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारसुद्धा केली होती. “तुम्ही ही कथा दाखवून चांगलं काम केलं नाही”, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं होतं.
अदा शर्माचा फोन नंबर लीक झाल्याची माहिती समोर येताच तिचे चाहते भडकले आहेत. हैदराबाद आणि मुंबई सायबर सेलच्या ट्विटरवर ते संबंधित युजरविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत. याप्रकरणी अद्याप अदाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आतापर्यंत या चित्रपटाने 200 हून अधिक कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
सुदिप्तो सेन यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यात अदासोबतच सोनिया बलानी, योगिता बहानी आणि सिद्धी इदनानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अदा शर्माने 2008 मध्ये बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. मात्र ‘द केरळ स्टोरी’मुळे ती आता प्रकाशझोतात आली आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल ती ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मी या इंडस्ट्रीतून नाही. त्यामुळे जेव्हाकधी मी एखादी ऑफर स्वीकारायचे, तेव्हा तो माझा शेवटचा चित्रपट असेल असा विचार करायचे. मला स्वत:वरच शंका असायची. कोणी माझ्या कामावर विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मला पडायचा. पण आता खूप चांगलं वाटतंय. इंडस्ट्रीबाहेरून आलेली एक मुलगी असं काही करू शकेल, याचा कोणी विचार केला असेल. मला अशा अनेक कलाकारांचे मेसेज आले की, तुझ्यामुळे आम्हालासुद्धा सकारात्मकता मिळाली आहे.”