‘द केरळ स्टोरी’ला प्रचारकी म्हणणाऱ्या कमल हासन यांना दिग्दर्शकांचं सडेतोड उत्तर; म्हणाले ‘याला दुटप्पीपणा..’
याआधीही चित्रपटातील कलाकारांनी आणि निर्मात्यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याच्या आरोपांना फेटाळलं आहे. चित्रपटाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी केरळमधल्या काही पीडित मुलींनाही मंचावर सर्वांसमोर आणलं होतं.
मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच वादात सापडला होता. काही राज्यांमध्ये बंदीनंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली. हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका सोशल मीडियावरील ठराविक वर्गाकडून आणि सेलिब्रिटींकडूनही झाली. अभिनेते कमल हासन यांनीसुद्धा चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना ‘द केरळ स्टोरी’ला प्रचारकी म्हटलंय. “मी प्रचारकी चित्रपटांच्या विरोधात आहे. चित्रपटाच्या शेवटी फक्त ‘खरी कथा’ असा लोगो लावून चालत नाही. तर कथासुद्धा खरी असावी लागते आणि हा चित्रपट खरा नाही”, अशा शब्दांत त्यांनी चित्रपटावर टीका केली. त्यावर आता दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुदिप्तो सेन म्हणाले, “मी अशा वक्तव्यांवर व्यक्त होत नाही. सुरुवातीला मी स्पष्टीकरण देत बसायचो. पण आता मी ते करत नाही, कारण जे लोक या चित्रपटाला प्रचारकी म्हणाले होते, त्यांनाही हा चित्रपट आवडला आहे. ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, ते त्याच्यावर टीका करत आहेत. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे या लोकांनी तो पाहिला नाही. म्हणूनच त्यांना ‘द केरळ स्टोरी’ प्रचारकी वाटतो. आपल्या देशातल्या काही लोकांची मूर्खपणाची साचेबद्ध विचारसरणी आहे की आयुष्य हे काळं किंवा पांढरंच असावं. पण आयुष्य हे या दोघांच्या मधे राखाडीसुद्धा असतं हे त्यांना माहीत नाही.”
“जर भाजपला हा चित्रपट आवडत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की हा त्यांचा चित्रपट आहे. फक्त भाजपच नाही तर काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष.. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 37 देशांना आणि लोकांना हा चित्रपट आवडतोय. जरी त्यांना टीका करायची असेल तरी ते मला कॉल करून माझ्यासोबत चर्चा करत आहेत. मला त्याबद्दल कोणताच पश्चात्ताप नाही. या चित्रपटाला प्रचारकी म्हणून आणि तो न पाहताच त्याच्याबद्दल मत व्यक्त करून ती व्यक्ती स्वत: प्रचारकी गोष्टींमध्ये सहभागी झाली आहे. याला दुटप्पीपणा किंवा ढोंगीपणा याशिवाय आणखी काय म्हणावं? मी त्यांना स्पष्टीकरण देणं थांबवलंय”, असंही ते पुढे म्हणाले.
याआधीही चित्रपटातील कलाकारांनी आणि निर्मात्यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याच्या आरोपांना फेटाळलं आहे. चित्रपटाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी केरळमधल्या काही पीडित मुलींनाही मंचावर सर्वांसमोर आणलं होतं.