The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचा अपघात; चाहत्यांकडून काळजी व्यक्त

| Updated on: May 15, 2023 | 7:34 AM

सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 112.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर याच चित्रपटाची जादू पहायला मिळतेय.

The Kerala Story | द केरळ स्टोरी फेम अदा शर्माचा अपघात; चाहत्यांकडून काळजी व्यक्त
The Kerala Story
Image Credit source: Instagram
Follow us on

तेलंगणा : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. देशभरात वाद सुरू असतानाही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे रविवारी तेलंगणामधल्या करीमनगर याठिकाणी हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणार होते. मात्र रस्त्यात चित्रपटाच्या टीमचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. या अपघातात टीममधील काही सदस्य जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर आता अदा शर्माने ट्विट करत याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. संपूर्ण टीम सुखरूप असून काळजी करण्याचं काही कारण नाही असं तिने म्हटलंय.

रविवारी 8 वाजताच्या सुमारास तिने ट्विट करत माहिती दिली आहे. ‘मी ठीक आहे. आमच्या अपघाताविषयीचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मला असंख्य मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम ठीक आहे, आम्ही सगळे सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही, चिंता करावी अशी कोणतीही मोठी गोष्ट नाही पण तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल खूप खूप आभार,’ असं तिने स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

अदा शर्माच्या आधी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एक ट्विट करत मेडिकल इमर्जन्सीमुळे यात्रेत सहभागी होता येणार नाही असं सांगितलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘आज आम्ही करीमनगर याठिकाणी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आमच्या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी येणार होतो. मात्र आरोग्याच्या काही समस्येमुळे आम्ही प्रवास करू शकत नाही. करीमनगरमधल्या लोकांची मी मनापासून माफी मागतो. आम्ही आपल्या मुलींना वाचवण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. कृपया आमची साथ द्या.’

अदा शर्माचं ट्विट-

दिग्दर्शकांचं ट्विट-

सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 112.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर याच चित्रपटाची जादू पहायला मिळतेय. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतलं, याविषयीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. देशभरात या चित्रपटातून वादही सुरू आहे आणि त्याचवेळी चित्रपटाचं कौतुकसुद्धा होत आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरळ स्टोरी’ हा 100 कोटींची कमाई करणार चौथा चित्रपट ठरला आहे.