मुंबई : दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात सोळा वर्षांच्या एका मुलीचा अनेक लोकांच्या डोळ्यांदेखत चाकूचे वार करून आणि नंतर डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची भीषण घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. साहिल या 20 वर्षांच्या आरोपीने रविवारी रात्री दाट लोकवस्तीच्या एका वर्दळीच्या गल्लीत या मुलीच्या डोक्यात दगड घालण्यापूर्वी तिला वीसहून अधिक वेळा भोसकलं. त्याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर इथून अटक करण्यात आली. या घटनेवर आता ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतल्या या भीषण घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“दहशतवादाविरोधात आपण थोडं कमी कठोर बनलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत. आपल्याला त्याविरोधात आवाज उठविण्याची खूप गरज आहे. नुकतंच दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला. तुम्हाला काय वाटतं, अशा लोकांना कशी वागणूक दिली पाहिजे? त्या लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे की अजूनही आपण हा विचार करायचा की देशातील माहौल खराब होईल. आपण अशा लोकांना काहीच बोलत नाही, म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळतंय. मी जेव्हा तो व्हिडीओ पाहिला, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तो व्हिडीओ पूर्ण पाहूच शकलो नाही. त्यामुळे मला वाटतं की आपण आपल्या चित्रपटांमध्ये अधिक कठोर दृष्टिकोन अंगीकारायला हवा”, असं ते म्हणाले.
दिल्लीत हत्येचा भीषण प्रकार घडत असताना लोक तिथून जात आहेत, भीतीयुक्त नजरेनं पाहत आहेत पण आरोपीला थांबवण्यासाठी काही करत नाहीत, असं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडीओत दिसत आहे. मुलीच्या हत्येनंतर साहिल तिथून पळून गेला. साहिल आणि ही मुलगी यांची मैत्री होती, मात्र शनिवारी त्यांचं भांडणं झालं होतं. रविवारी या मुलाने तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्याचं ठरवलं होतं. मात्र रविवारी रात्री ती रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिला अडवलं आणि अनेकवेळा भोसकलं. यानंतर त्याने तिच्या डोक्यात अनेकदा दगडही घातला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.