The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माने ‘या’ कारणासाठी सोडलं शिक्षण; आता आहे इतक्या संपत्तीची मालकीण
अदा शर्माने 2008 मध्ये '1920' या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने हसी तो फंसी, एस/ओ सत्यमूर्ती, क्षणम आणि कमांडो 3 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
मुंबई : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्याच अडकला आहे. आज (5 मे) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. केरळमधील हिंदू तरुणींना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेत सामील करण्यापूर्वी इस्लाममध्ये धर्मांतर आणि कट्टरतावाद यावर आधारित हा चित्रपट आहे. म्हणूनच या कथेवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या चित्रपटाला केरळ सरकार तसंच काँग्रेस आणि सीपीएमसारख्या राजकीय पक्षांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. हा चित्रपट प्रचारकी असून त्यामागे जातीय फूट निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.
मुंबईत जन्मलेल्या अदा शर्माचे वडील एस. एल. शर्मा हे मूळचे तमिळनाडूचे असून भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये ते कॅप्टन होते. अदाची आई शीला शर्मा या मूळच्या केरळच्या असून त्या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. अदाने नृत्य आणि चित्रपटात काम करण्यासाठी शालेय शिक्षण सोडलं. तिने कथ्थकमध्येच पदवीचं शिक्षण घेतलंय. त्याचसोबत साल्सा, जॅझ, बॅले यांसारखे इतर नृत्यप्रकारसुद्धा ती शिकली आहे.
अदा शर्माने 2008 मध्ये ‘1920’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने हसी तो फंसी, एस/ओ सत्यमूर्ती, क्षणम आणि कमांडो 3 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अदाची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं.
View this post on Instagram
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदाने केरळमधल्या शालिनी उन्नीकृष्णन या एका हिंदू तरुणीची भूमिका साकारली आहे. शालिनीला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं. मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यानंतर तिला फातिमा असं नाव दिलं जातं आणि त्यानंतर ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं. या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर अदाने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. विरोध करणाऱ्यांनी आधी संपूर्ण चित्रपट पहा आणि मग त्यावर मतं मांडा, असं ती म्हणाली.
‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर काहींमध्ये चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली. तर काहींनी निर्माते-दिग्दर्शकांवर केरळची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला. मात्र नेमकं सत्य काय आहे आणि केरळमध्ये 30 हजारहून अधिक मुली कशा गायब झाल्या, हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून कोर्टात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली.