Sulochana Latkar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते ‘या’ नेत्यांनी सुलोचना दीदी यांच्या आठवणी केल्या ताज्या, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत
सुलोचना दीदी लाटकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा एक धक्का बसलाय. सुलोचना दीदी लाटकर यांनी मुंबईतील एका रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 3 तारखेला तब्येत खराब झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी शेवटचा श्वास घेत जगाचा निरोप घेतलाय.
मुंबई : नुकताच ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाले आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सुलोचना दीदी यांनी आपल्या करिअरची सुरवात बालकलाकार म्हणून केली. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळी चित्रपटात (Movie) काम केले त्यावेळी त्या अवघ्या 4 वर्षांच्या होत्या. अत्यंत मेहनतीने 1946 मध्ये कीमा या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. विशेष म्हणजे सुलोचना दीदी यांनी त्यांच्या करिअरमध्ये तब्बल 250 बाॅलिवूड चित्रपटामध्ये काम केले. सुलोचना दीदी यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील सुलोचना दीदी यांनी काम केले आहे.
अभिनय क्षेत्रातील असामान्य व्यक्तीमत्वाचा चेहरा हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी लाटकर यांच्या निधनानंतर दु: ख व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, अभिनय क्षेत्रातील असामान्य व्यक्तीमत्वाचा एक चेहरा हरपला आहे. मार्च महिन्यात सुलोचना दीदी ज्यावेळी आजारी पडल्या होत्या, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी यांच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे जाहिर केले होते. एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीये.
एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे- देवेंद्र फडणवीस
सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुलोचना दीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. तीनशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे- शरद पवार
सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर शरद पवार यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. शरद पवार म्हणाले की, रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या निधनाने सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला- सुप्रिया सुळे
सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, गेली काही दशके हिंदी, मराठी भाषेत रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या या अनेक भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहेत. सुलोचना दीदी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला.