‘ही ओव्हरस्मार्ट पिढी..’; समय रैनाला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं
कॉमेडियन समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समयने त्याच्या कॅनडामधील शोमध्ये त्यावर उपरोधिक टिप्पणी केली होती. त्यावरून कोर्टाने सुनावलं आहे.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडामध्ये टिप्पणी केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉमेडियन समय रैनाला कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर आपल्या शोमध्ये चर्चा केल्याबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी समय रैनावर टीका केली. त्याचप्रमाणे न्यायालयाला हलक्यात न घेण्याचा त्याला इशारा दिला. “ही तरुण पिढी स्वत:ला फार ओव्हरस्मार्ट समजते. त्यांना वाटतं की आम्ही आऊटडेटेड आहोत. परंतु त्यांच्याशी कसं वागायचं हे आम्हाला माहीत आहे. न्यायालयाला हलक्यात घेऊ नका”, असं न्यायमूर्ती सूर्यकांत सुनावणीदरम्यान म्हणाले. गेल्या महिन्यात समयच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी समय आणि रणवीरविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले होते.
पालकांबद्दल अश्लील प्रश्न विचारलेल्या रणवीर, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्वा मखिजा आणि इतरांविरुद्ध देशभरात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या. तेव्हापासून समय कॅनडामध्येच आहे. तिथे त्याचे शोज आयोजित करण्यात आले आहेत. त्यातील एका शोदरम्यान समयने या वादावर टिप्पणी केली होती. माझ्या वकिलाची फी भरल्याबद्दल धन्यवाद, असं तो शोच्या सुरुवातीला प्रेक्षकांना म्हणाला. इतकंच नव्हे तर “या शोमध्ये अशा बऱ्याच संधी येतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप काही हास्यास्पद बोलू शकतो. पण तेव्हा ‘बीअर बायसेप्स’ला (रणवीर अलाहबादिया) आठवा भावांनो”, अशीही उपरोधिक टिप्पणी समयने केली होती. नंतर शो संपताना तो म्हणाला, “शायद समय खराब चल रहा है मेरा, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ”, (कदाचित माझी वेळ वाईट सुरू आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, मीच वेळ आहे.) यावरूनच आता सुप्रीम कोर्टाने त्याला फटकारलं आहे.
समय रैनाचं नाव न घेता कोर्टाने म्हटलं, “त्यातला एक जण कॅनडाला गेला आणि तिथे तो याबद्दल बोलत होता. ही तरुण पिढी स्वत:ला अतिहुशार समजतेय. आमची पिढी जुनी झाल्याचं त्यांना वाटतंय. याप्रकरणातला एक जण कॅनडाला गेला आणि तिथे त्याने वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांना हे माहीत नाही की या न्यायालयाकडे कोणते अधिकार क्षेत्र आहे आणि काय करता येईल. आम्हाला ते नको आहे कारण ते तरुण आहेत हे आम्ही समजतो.”




दरम्यान सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहबादियाला दिलासा दिला आहे. रणवीरला त्याचं पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. मात्र ते नैतिकता आणि सभ्यतेच्या सामान्य मानकांचं उल्लंघन करणार नाही, याची खात्री करण्यास सांगितलं आहे. “सध्या याचिकाकर्त्यांना कोणतेही कार्यक्रम प्रसारित करण्यापासून रोखण्यात आलं आहे. जर याचिकाकर्त्याने असं प्रतिज्ञापत्र सादर केलं की त्याचे पॉडकास्ट शोज नैतिकता आणि सभ्यतेचं पालन करतती, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक तते पाहू शकतील, तर याचिकाकर्त्याला रणवीर शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी आहे”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
न्यायालयाने यापूर्वी रणवीरला अनेक अटींवर अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं. ज्यामध्ये तो कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही या अटीचाही समावेश होता.