मुंबई- साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) घरात एका चोराने शिरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेखातर महेश बाबूच्या घराला 30 फूट उंचीचा बाऊंड्रीवॉल बांधण्यात आला आहे. चोराने (Thief) या बाऊंड्रीवॉलवरून उडी मारून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र उडी मारताना त्याला दुखापत झाली. त्याच्या आवाजाने सुरक्षारक्षकांना घटनेची चुणूक लागली. अखेर त्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात नेलं.
महेश बाबू यांच्या आईच्या निधनाच्या एक दिवस आधी एका चोराने त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने 30 फूट उंचीची सुरक्षाभिंत ओलांडली. मात्र एवढ्या उंचीवरून उडी मारताना त्याला दुखापत झाली. चोर वेदनेनं विव्हळत असताना सुरक्षारक्षकांनी त्याचा आवाज ऐकला आणि त्याला पकडलं. यानंतर त्यांनी ज्युबिली हिल्स पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीच्या उद्देशाने घरात शिरण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. चोराचं नाव कृष्णा असं आहे. मूळचा ओडिशाचा असलेला कृष्णा काही दिवसांपूर्वीच हैदराबादला आला. हैदराबादच्या एका नर्सरीमध्ये तो काम करत होता. ज्यावेळी चोरीची घटना घडली, तेव्हा महेश बाबू घरी नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचं 28 सप्टेंबर रोजी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. महेश बाबूचे वडील कृष्णा यांनी दोनदा लग्न केलं होतं. इंदिरा देवी यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री निर्मलाशी लग्न केलं. घटस्फोटानंतर इंदिरा देवी एकट्याच राहत होत्या. महेश बाबू त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आईला भेटायला जात असत.