हुबेहुब माधुरीसारखी दिसायची ही अभिनेत्री, क्रिकेटरसोबत विवाहानंतर संपलं करिअर
माधुरी दीक्षितच्या सौंदर्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तिचे सौंदर्य तिची पहिली ओळख आहे. त्यानंतर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडली. पण तिच्यासारखीच दिसणारी आणखी एक अभिनेत्री होती. जिला पाहिल्यावर ती माधुरी दीक्षित असल्याचाच भास होत होता. कोण होती ती अभिनेत्री.
मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे सौंदर्य पाहून अनेकांना तिचं वेड लागतं. जगभरात तिचे चाहते आहेत. तिने आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण तिची जागा कोणत्याही अभिनेत्रींना घेता आली नाही. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जी तिच्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाली. ती म्हणजे फरहीन प्रभाकर. फरहीन ही माधुरी दीक्षित सारखी दिसत असल्याने अधिक चर्चेत आली. परंतु ती इंडस्ट्रीमध्ये तिचे स्टारडम टिकवू शकली नाही आणि आज कुठेतरी हरवून गेली.
फरहीन प्रभाकर हिने 1992 मध्ये ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या सिनेमात ती अभिनेता रोनित रॉयसोबत दिसली होती. कुरळे केस आणि माधुरी सारखा लूक यामुळे ती अधिक चर्चेत राहिली. तिचे डोळे देखील माधुरी दीक्षित सारखे होते.
फरहीनने अक्षय कुमारसोबत तिचा दुसरा चित्रपट केला. 1993 मध्ये आलेल्या ‘सैनिक’ चित्रपटात फरहीन अक्षय कुमार आणि रोनित रॉयसोबत दिसली होती.
अभिनय क्षेत्रात शिखरावर असताना तिने आपल्या प्रेमासाठी सगळ्याच गोष्टींचा त्याग केला. फरहीन क्रिकेटर मनोज प्रभाकरच्या प्रेमात पडली होती. मनोज प्रभाकरने फरहिन सोबत विवाहासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
लग्नानंतर फरहीन संसारात मग्न झाली. त्यानंतर ती ग्लॅमर जगापासून दुर झाली. अभिनेत्रीने एका मुलाखतीत म्हटले होते की, तिला तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करायचे होते. कारण ती एका तुटलेल्या कुटुंबातून आली होती.