चीनचे नागरिक चक्क बप्पी लहरी यांचं ‘हे’ गाणं वाजवून लॉकडाऊनचा करतायत विरोध
चीनमध्ये लॉकडाऊनचा विरोध; बप्पी लहरी यांचं गाणं वाजवून का करतायत निषेध?
चीन- चीनमध्ये पुन्हा एकदा कोविड- 19 मुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या विविध भागात लॉकडाऊन लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा लाखो चिनी नागरिक निषेध करत आहेत. या निषेध करणाऱ्या नागरिकांनी निषेधासाठी चक्क एका हिंदी गाण्याची निवड केली आहे. जवळपास चार दशकांपूर्वी दिवंगत संगीतकार बप्पी लहरी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं. तेच गाणं आता चिनी नागरिक सरकारच्या निषेधात वाजवताना दिसत आहेत.
1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातील ‘जिमी जिमी, आजा आजा’ हे गाणं आहे. सरकारच्या शून्य-कोविड रुग्णाच्या धोरणाविरोधात राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी चिनी नागरिक या गाण्याचा वापर करत आहेत. आता हेच गाणं का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यामागचं कारणही तितकंच रंजक आहे.
जिमी जिमी या हिंदी गाण्याचा वापर का?
गाण्यातील जिमी जिमी हे शब्द मँडरिन भाषेतील Jie mi या शब्दासारखेच वाटतात. ज्याचा अनुवाद ‘मला जेवण द्या’ असा होतो. लॉकडाऊनदरम्यान त्यांना जीवनावश्यक खाद्यपदार्थांपासून कसं वंचित ठेवलं जातं हे दर्शविण्यासाठी सोशल मीडियावर अनेक चिनी नागरिक रिकामं भाडं दाखवून ‘जिमी जिमी’ हे हिंदी गाणं वापरत आहेत.
हे गाणं बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलं होतं. तर पार्वती खान आणि विजय बेनेडिक्ट यांच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आलं होतं. ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री किम यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.
रविवारी चीनमध्ये 2675 कोविडचे रुग्ण आढळले. हा आकडा आदल्या दिवसापेक्षा 802 ने मोठा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शहरांमध्ये कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवलं जाईल.