मुंबई : 10 जानेवारी 2024 | एखादा चित्रपट पहावा किंवा पाहू नये हे ठरवण्याआधी असंख्य प्रेक्षक त्याला मिळालेला आयएमडीबी रेटिंग तपासतात. जर चित्रपटाला मिळालेलं आयएमडीबी रेटिंग चांगलं असेल तर तो चित्रपट चांगला, असा सर्वसामान्य समज आहे. कारण प्रेक्षकच एखाद्या चित्रपटाला किंवा वेब सीरिजचा ही रेटिंग देतात आणि त्याची लोकप्रियता ठरवतात. सध्या एका बॉलिवूड चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून याच चित्रपटाने आयएमडीबीवर सर्वाधिक रँकिंग मिळवली आहे. ‘ओपनहायमर’, ‘बार्बी’ यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांनाही त्याने मागे टाकलंय. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून विधू विनोद चोप्रा यांचा ’12th Fail’ (बारवी फेल) आहे. विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खऱ्या कथेवर आधारित आहे.
IMDb च्या टॉप 250 भारतीय चित्रपटांच्या यादीत ’12th Fail’ हा चित्रपट पहिल्या स्थानी असून त्याला दहापैकी सर्वाधिक 9.2 रेटिंग मिळाली आहे. टॉप 5 मधील इतर भारतीय चित्रपटांमध्ये ‘रामायण : द लेजंड ऑफ प्रिन्स राम’ (अॅनिमेटेड), मणिरत्नम यांचा ‘नायकन’, हृषिकेश मुखर्जी यांचा ‘गोलमाल’ आणि आर. माधवनचा ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ यांचा समावेश आहे. ‘बारवी फेल’ या चित्रपटाने 2023 मधील हॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. ‘स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स’ (8.6 रेटिंग), ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ (8.4 रेटिंग), ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी वॉल्युम 3’ (7.9 रेटिंग), मार्टिन स्कॉर्सिसिचा ‘किलर ऑफ द फ्लॉवर मून’ (7.8 रेटिंग), ‘जॉन वीक : चाप्टर 4’ (7.7 रेटिंग) आणि ‘बार्बी’ (6.9 रेटिंग) यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांना विक्रांत मेस्सीने मात दिली आहे.
’12th Fail’ हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर आधारित आहे. आयपीएस ऑफिसर बनण्यासाठी मनोज कुमार शर्मा यांनी कशी मेहनत घेतली, त्यात कोणते अडथळे आले आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याविषयीची ही कथा आहे.
आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.