मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ असाही होता जेव्हा अभिनेत्री त्यांच्या फिटनेसबद्दल फारशा सजग नसायच्या. त्या काळात एक अशी अभिनेत्री आली, जी तिच्या ग्लॅमर आणि सौंदर्यामुळे तुफान चर्चेत आली. हा लहानपणीचा फोटो त्याच अभिनेत्रीचा आहे. फोटोतील या गुबगुबीत मुलीला पाहून कदाचित तुम्ही ओळखू शकणार नाही, पण ही मुलगी मोठी झाल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक झाली. आज वयाची सत्तरी पार केल्यानंतरही या अभिनेत्रीचं सौदर्य आणि फिटनेस तरुणांनाही लाजवेल असं आहे. फोटोतील या चिमुकल्या मुलीला तुम्ही ओळखू शकलात का? या अभिनेत्रीचं नाव आहे झीनत अमान.
लहानपणी गुबगुबीत असणाऱ्या झीनत अमान मोठं झाल्यानंतर अत्यंत फिट आणि ग्लॅमरस झाल्या. त्यांनी मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेतही भाग घेतला होता. या स्पर्धेत त्या विजेतेपद पटकावू शकल्या नव्हत्या, मात्र त्यांना ‘फर्स्ट प्रिन्सेस’ हे नावं दिलं गेलं. त्यानंतर त्यांनी मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनलमध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी विजेतेपद पटकावून देशाची मान उंचावली. देशातील पहिली मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल होण्याचा मान झिनत अमान यांना मिळाला होता. हा किताब जिंकल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
झीनत अमान यांना पहिल्या चित्रपटातून फारसं यश मिळालं नव्हतं. ‘द एविल विदिन’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता, मात्र बॉक्स ऑफिसवर त्याने विशेष कामगिरी केली नाही. यानंतर हलचल आणि हंगामा हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. तीन फ्लॉप चित्रपटांनंतर देवानंद यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आणि बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
झीनत अमान यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुख मिळालं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी त्यावेळी सुपरस्टार संजय खानसोबत गुपचूप लग्न केलं होतं. मात्र संशयामुळे संजय खान त्यांना इतकं मारायचे, ज्यामुळे झीनत अमान यांच्या डोळ्याला मार लागला. त्यानंतर त्यांनी मजहर खानशी दुसरं लग्न केलं. मात्र या लग्नानंतरही त्या खुश राहू शकल्या नाहीत. आजारपणामुळे मजहर खान यांचं निधन झालं तेव्हा सासरच्या मंडळींनी झीनत अमान यांना त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचीही परवानगी दिली नाही. यानंतर त्यांनी सरफराज जफर अहसान यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या वयात फार अंतर होतं. मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकू शकलं नाही.