‘सिलसिला’साठी जया बच्चन नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंत; बऱ्याच वर्षांनंतर खुलासा
परवीन बाबी यांचा जन्म 4 एप्रिल 1954 रोजी झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्यासोबतची त्यांची जोडी हिट होती. 70 ते 80 च्या दशकात ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री होती.
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नव्हते. मात्र अनेक वर्षांनंतरही ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहेत. यापैकी काही चित्रपटांनी दमदार गाण्यांमुळे विशेष छाप सोडली तर काही चित्रपटांमधील कलाकारांनी प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. असाच एक चित्रपट म्हणजे 1981 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नव्हता. मात्र त्यातील गाणी आणि कास्टिंगमुळे हा चित्रपट अविस्मरणीय ठरला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि शशी कपूर यांनी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. मात्र सुरुवातीपासूनच चित्रपटाची ही कास्टिंग नव्हती. जया बच्चन यांच्या जागी आधी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती. बऱ्याच वर्षांनंतर या गोष्टीचा खुलासा झाला.
ज्येष्ठ अभिनेते रंजित यांनी याविषयीचा खुलासा केला. ‘सिलसिला’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यासोबत अभिनेत्री परवीन बाबीला निवडलं गेलं होतं, असं त्यांनी सांगितलं. पण नंतर ही भूमिका जया बच्चन यांच्या पदरात पडली. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रंजित यांनी सांगितलं की ‘सिलसिला’मधून काढून टाकण्यात आल्यानंतर परवीन बाबी खूप नाराज होत्या. परवीन बाबी यांचं जानेवारी 2005 मध्ये निधन झालं.
“परवीन बाबी माझी खूप चांगली मैत्रीण होती. पण ती तितकीच एकाकी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचं आणि तिच्या एका दातामुळे आम्ही तिला ‘फावडा’ म्हणून चिडवायचो. एकेदिवशी ती खूप नाराज होऊन रडू लागली होती. मी तिला विचारलं की, काय झालं? त्यावेळी आम्ही काश्मीरमध्ये होतो. सिलसिलामध्ये परवीन बाबीला भूमिका देण्यात आली होती. मात्र नंतर तिला तो चित्रपट सोडण्यास सांगितलं गेलं. नंतरच्या नाटकी वादामुळे त्यांनी रेखा आणि जया भादुरी यांची निवड केली. अन्यथा परवीन आणि रेखा यांच्या भूमिका असत्या”, असं रंजित यांनी सांगितलं.