‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेता दिवाळखोरीत; शेतीची वाट धरून ‘शार्क टँक इंडिया’मध्ये दिलं ऑडिशन पण..
‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका टेलिव्हिजनवर प्रचंड गाजली होती. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. याच मालिकेत काम करणाऱ्या राजेश कुमारने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने अभिनय क्षेत्र सोडून शेतीची वाट धरली होती.
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या गाजलेल्या मालिकेतील रोसेश साराभाईला तुम्ही ‘शार्क टँक इंडिया’च्या शोमध्ये कल्पना करू शकता का? पण असं चित्र खरंच पाहायला मिळालं असतं जर मालिकेत रोसेशची भूमिका साकारणारा अभिनेता राजेश कुमारला ‘शार्क टँक इंडिया’ या लोकप्रिय शोच्या परीक्षकांनी निवडलं असतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेशने खुलासा केला की, त्याने ‘शार्क टँक इंडिया’साठी अर्ज केला होता. इतकंच नव्हे तर त्याने या शोमध्ये दोन राऊंड्ससुद्धा पार केले होते. अभिनय क्षेत्र सोडून शेतीकडे वळल्यानंतर राजेशने ‘शार्क टँक इंडिया’मध्ये जाऊन आपल्या व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजेश त्याच्या करिअरमधील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “मी शार्क टँक इंडियामध्ये अर्ज केला होता. तीन राऊंड्सपैकी मी दोन राऊंड्स क्लिअरसुद्धा केले होते. तुम्हाला तुमचे काही व्हिडीओ पाठवावे लागतात. माझा चेहरा इंडस्ट्रीत परिचित असल्याने मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. अभिनेता शेतीविषयी बोलतोय, या अँगलचा विचार करून ते संधी देतील, असं मला वाटलं होतं. कोलकातामध्ये माझं प्रेझेंटेशन होतं आणि एका दिवसात ते संपलं होतं. माझ्या वडिलांनी तिकिटाचे पैसे भरले होते”, असं त्याने सांगितलं.
View this post on Instagram
“शार्क टँक इंडियाच्या ऑडिशनमधून बाहेर पडण्याआधी मला नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘हड्डी’ या चित्रपटासाठी फोन आला होता. त्यांना मला भेटायचं होतं. पण त्यावेळी माझ्यात आत्मविश्वासच उरला नव्हता. ऑडिशनशिवाय एखादी भूमिका मिळेल असं वाटलंच नव्हतं. त्यामुळे जेव्हा मी कास्टिंग डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दिग्दर्शकांना मला भेटायचं आहे. ते माझं ऑडिशन घेतील असं वाटलं होतं. निर्मिती संस्थेतील व्यक्ती मानधनाविषयी तुमच्यासोबत चर्चा करेल, असं त्यांनी सांगितलं. पण तेसुद्धा ऑडिशननंतर होईल, असं वाटलं होतं. पण सुदैवाने ऑडिशनशिवाय मला ती भूमिका मिळाली होती. ”
टीव्ही इंडस्ट्री आणि अभिनयविश्वातील कामाला कंटाळून शेतीकडे वळल्याचं राजेशने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र शेतात काम करताना राजेशने काही वर्षांतच जमा केलेली बरीच रक्कम गमावली. या निर्णयामुळे दिवाळखोरीत आल्याचा खुलासा त्याने केला होता.