मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडे पाहून वय हा केवळा आकडा आहे असं वाटतं. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही या अभिनेत्री फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देतात. फोटोत दिसणारी ही अभिनेत्री नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती. मात्र आजही तिच्या सौंदर्यात तसूभरही कमतरता नाही. या अभिनेत्रीने 1993 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल’ या सौंदर्यस्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. 1997 मध्ये ‘भाई’ या चित्रपटात तिने अभिनेता सुनील शेट्टीसोबत भूमिका साकारली होती. त्यावेळी ती अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होती. आतापर्यंत तुम्हाला या अभिनेत्रीचं नाव ओळखता आलंच असेल. तर ही अभिनेत्री आहे पूजा बत्रा.
पूजा बत्रा आजही सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना मात देते. तिचा जन्म 27 ऑक्टोबर 1976 रोजी उत्तरप्रदेशातील फैजाबादमध्ये झाला. 1997 मध्ये तिने ‘विरासत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय ती 1997 मध्ये ‘चंद्रलेखा’ या मल्याळम चित्रपटातही झळकली. 1998 मध्ये तिने ‘ग्रीकू वीरुडू’ या तेलुगू चित्रपटात आणि त्यानंतर काही पंजाबी चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेची रनरअप ठरलेली पूजाने 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. तर 1993 च्या मिस इंटरनॅशनल सौंदर्यस्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
पूजाने 2002 मध्ये डॉक्टर सोनू आहलुवालियाशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सोनू आणि पूजाचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये तिने अभिनेता नवाब शाहशी दुसरं लग्न केलं. नवाबबद्दल बोलताना पूजा म्हणाली होती की, “आम्ही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटलो. आम्ही आमच्या आयुष्याच्या योग्य वेळी भेटलो. त्याच परिस्थितीत आम्ही भावनिक होतो. आम्हाला एकमेकांना समजावून सांगण्याचा फारसा प्रयत्न करावा लागला नाही. मला त्याच्याबद्दलची सर्वात चांगली वाटणारी गोष्ट म्हणजे तो एक कौटुंबिक व्यक्ती आहे.
पूजा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी एक काळ असा होता जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय जाहिरातींमध्येही तिने दीर्घकाळ काम केलं होतं. ‘हेड अँड शोल्डर्स’ या अमेरिकन शॅम्पूच्या जाहिरातीसाठी ती पहिली भारतीय चेहरा ठरली होती.