मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री प्रिया राजवंशने 70 च्या दशकात बॉलिवूड गाजवलं होतं. 30 डिसेंबर 1936 रोजी तिचा जन्म झाला. हिर रांझा, हंसते जख्म यांसारख्या तेव्हाच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने काम केलं. प्रिया राजवंशचं खरं नाव वीरा सुंदर सिंह होतं. हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये तिचा जन्म झाला होता. तिचे वडील वनविभागात संरक्षक म्हणून काम करायचे. प्रियाला सुरुवातीपासूनच अभिनयात रस होता. म्हणूनच तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमधल्या रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्टमध्ये (RADA) प्रवेश घेतला. तिला तिच्या एका फोटोग्राफमुळे बॉलिवूडमध्ये काम करण्याची पहिली संधी मिळाली होती.
प्रिया जेव्हा लंडनमध्ये होती, तेव्हा तिच्या एका फोटोग्राफवर ठाकूर रणवीर सिंह यांची नजर पडली. हे त्याकाळचे प्रसिद्ध दिग्दर्शिक होते. 1962 मध्ये रणवीर सिंह यांनी प्रियाची चेतन आनंद (देव आनंद यांचे भाऊ) यांच्याशी भेट घडवून आणली आणि त्यानंतर दोघांनी 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हकीकत’ चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चेतन आनंद आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर तिने फक्त चेतन आनंद यांच्याच चित्रपटात काम करण्याचं ठरवलं होतं.
प्रियाचा सर्वांत लोकप्रिय चित्रपट ‘हिर रांझा’ 1970 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिने राज कुमार यांच्यासोबत भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्याकाळी तुफान हिट ठरला होता. याशिवाय हंसते जख्म, हिंदुस्तान की कसम, कुदरत, आणि साहेब बहादूर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं. 1985 मध्ये तिचा शेवटचा ‘हाथों की लकीरें’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर तिने अभिनयातील करिअरला रामराम केला.
प्रिया राजवंश आणि चेतन आनंद हे नंतर एकत्र राहू लागले होते. मात्र या दोघांनी लग्न केलं नव्हतं. 1997 मध्ये चेतन आनंद यांचं निधन झालं. त्यापूर्वी त्यांनी मृत्यूपत्रात प्रियाचा उल्लेख केला होता. या मृत्यूपत्रानुसार चेतन यांच्या पहिल्या पत्नीपासूनच्या दोन मुलांचा आणि प्रियाचा संपत्तीवर अधिकार होता. मात्र प्रियाची चेतन आनंद यांच्या मुंबईतील बंगल्यातच 27 मार्च 2000 रोजी हत्या करण्यात आली. याप्रकरणी चेतन आनंद यांची दोन्ही मुलं केतन आनंद आणि विवेक आनंद यांच्यावर हत्येचे आरोप झाले. जुलै 2002 मध्ये ट्रायल कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर नोव्हेंबर 2002 मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 2011 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या त्यांच्या अपीलवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली. ही अपील अद्याप सुनावणीच्या टप्प्यात आहे.