TMKOC | ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांवर भिडे मास्तरांची प्रतिक्रिया; म्हणाले..
निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, "असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला."
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्मात्यांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. असित कुमार मोदी यांनी अनेकदा लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काम गमावण्याच्या भीतीने मी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं जेनिफरने म्हटलंय. त्याचसोबत ‘तारक मेहता..’च्या सेटवरील वातावरण हे अत्यंत पुरुषप्रधान असल्याचीही टीका तिने केली. या आरोपांवर आता मालिकेत भिडे मास्तरांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंदार चांदवडकर?
“मला समजत नाहीये की तिने असं का केलं? त्यांच्यात नेमकं काय घडलं याची मला काहीच कल्पना नाही”, असं ते म्हणाले. सेटवरील वातावरण पुरुषप्रधान असण्याच्या कमेंटवर ते पुढे म्हणाले, “सेटवर असा काही भेदभाव होत नाही. काम करण्यासाठी तिथे आनंदी वातावरण असतं. त्याशिवाय ही मालिका इतकी वर्षे चालली नसती.”
नेमकं काय घडलं?
निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”
निर्माते असितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया-
“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.
प्रोजेक्ट हेड काय म्हणाले?
“मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत तिची वागणूक योग्य नव्हती. शूटनंतर निघताना तिने कोणाचीच पर्वा न करता वेगाने कार चालवली. तिने सेटवरील मालमत्तेचंही नुकसान केलं. तिच्या वाईट वागणुकीमुळे आणि बेशिस्तपणामुळे आम्हाला तिचा करार संपवावा लागला. या घटनेवेळी असितजी अमेरिकेत होते. आता ती आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय आणि तथ्यहीन आरोप करतेय. आम्ही आधीच याविरोधात तक्रार दाखल केली आहे”, असं प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि जतिन बजाज म्हणाले.