19 दिवसांपासून अन्न-पाणी नाही..; आणखी बिघडली ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्याची प्रकृती
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंगची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता गुरुचरणच्या मैत्रिणीने त्याच्याविषयी खुलासा केला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंगची प्रकृती खालवली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्याने 19 दिवसांपासून खाणं-पिणं सोडून दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती भक्तीने दिली. इतकंच नव्हे तर रुग्णालयात गुरुचरणच्या बाजूने त्याचे कुटुंबीयसुद्धा नाहीत. त्याच्या कुटुंबीयांना फोन ‘स्विच ऑफ’ करून ठेवल्याचं भक्तीने सांगितलंय. गुरुचरणला संन्याय घ्यायचं होतं, असाही खुलासा तिने केला आहे.
भक्ती सोनीने गुरुचरणच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. “दुर्दैवाने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावतेय. त्याला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याची प्रकृती आणखी खराब झाल्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं. सध्या सरकारी रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीविषयी माहिती मिळवण्यासाठी मी त्याच्या आईच्या सतत संपर्कात आहे”, असं भक्तीने ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
View this post on Instagram
भक्ती सोनीने पुढे असंही सांगितलंय की गुरुचरण गेल्या 19 दिवसांपासून अन्न-पाण्याविना राहत होता. त्याने सर्व गोष्टींचा त्याग केला होता. म्हणून त्याची शुद्ध हरपली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने काम मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. अखेर गुरुचरणने सर्वकाही सोडून संन्यास घेण्याचं ठरवलं. गुरुचरणवर 1.2 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचा खुलासा भक्तीने यावेळी केला. “त्याच्यावर 1.2 कोटी रुपयांचं कर्ज आहे. पण त्याच्या वडिलांकडे 55 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुर्दैवाने प्रॉपर्टीसंदर्भात काही वाद सुरू आहेत. जर हे प्रकरण मिटवला आलं आणि प्रॉपर्टी विकली गेली, तर गुरुचरण त्याचं कर्ज फेडू शकेल”, असं तिने म्हटलंय.
याआधी गुरुचरणने रुग्णालयातून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्याची प्रकृती पूर्णपणे खालावल्याचं दिसून आलं होतं. “माझी तब्येत खूपच बिघडली आहे. रक्ताच्या चाचण्या करण्यातथ आल्या असून माझ्या प्रकृतीबाबतची माहिती तुम्हाला लवकरच देईन”, असं तो या व्हिडीओत म्हणाला होता. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.