‘तारक मेहता..’मधील रोशन सोढीची प्रकृती बिघडली; रुग्णालयातून शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांकडून काळजी व्यक्त
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंहला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुचरणने सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. म्हणूनच मालिका सोडल्यानंतरही त्यातील जुने कलाकार सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. अशीच एक भूमिका म्हणजे रोशन सोढी. अभिनेता गुरुचरण सिंगने मालिकेतील ही भूमिका साकारली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. मंगळवारी गुरुचरणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. या व्हिडीओमध्ये गुरुचरणला सलाईन लावल्याचंही पहायला मिळतंय. माझी प्रकृती बरीच खालावली आहे, असं त्याने या व्हिडीओत सांगितलंय. गुरुचरणचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.
या व्हिडीओमध्ये गुरुचरण म्हणाला, “माझी तब्येत खूपच बिघडली आहे. रक्ताच्या चाचण्या करण्यातथ आल्या असून माझ्या प्रकृतीबाबतची माहिती तुम्हाला लवकरच देईन.” या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘काल गुरू पुरबच्या दिवशी गुरु साहेबजींनी मला एक नवीन आयुष्य दिलं. मी त्यांचे अगणित आभार मानतो.’ त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘पाजी, नेमकं काय झालंय तुम्हाला’, असा प्रश्न एकाने विचारला. तर ‘लवकरात लवकर बरे व्हा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काही चाहत्यांनी गुरुचरणच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार असल्याचंही सांगितलं आहे.
View this post on Instagram
गेल्या वर्षी गुरुचरण सिंग अचानक त्याच्या घरातून गायब झाल्यामुळे चर्चेत होता. जवळपास महिनाभर पोलीस त्याचा शोध घेत होते. एका मिटींगसाठी जातो म्हणून गुरुचरण त्याच्या दिल्लीतल्या घरातून निघाला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नव्हता. त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर जवळपास तीस दिवसांनंतर गुरुचरण सुखरुप त्याच्या घरी परतला होता. त्यावेळी त्याने कर्जबाजारी झाल्याचं आणि हाती कोणतंही काम नसल्याचा खुलासा केला होता.