मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : एकीकडे संपूर्ण मुंबईत जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं, तर दुसरीकडे ‘ईमली’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेच्या सेटवर अत्यंत दु:खद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगावमधल्या दादासाहेब फाळके फिल्मसिटी इथल्या ‘ईमली’ या मालिकेच्या सेटवर एका क्रू मेंबरला वीजेचा झटका लागला. हा वीजेचा झटका इतका तीव्र होता की त्यात क्रू मेंबर गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा जीव गेला. याविषयी स्टार प्लस आणि ईमलीच्या टीमशी बातचित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या घटनेत ज्या व्यक्तीचं निधन झालं, त्याचं नाव महेंद्र होतं. गेल्या बऱ्याच काळापासून तो ईमली या मालिकेच्या सेटवर काम करत होता.
28 वर्षीय महेंद्रला काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर त्याच जागी वीजेचा झटका लागला होता. त्याच ठिकाणी 19 सप्टेंबर रोजी पुन्हा त्याला झटका लागला. महेंद्रने त्याच्या सहकर्मचाऱ्यांना त्या जागेबद्दल आधीच सूचना दिली होती आणि तिथे कोणाला न जाण्याचा सल्लादेखील दिला होता. वीजेचा तीव्र झटका लागल्यानंतर महेंद्रला जेव्हा तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा रस्त्यातच त्याने प्राण गमावले.
या दुर्घटनेनंतर बराच वेळासाठी ईमली या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. सेटवरच्या त्या धोकादायक जागेविषयी माहिती असतानाही महेंद्र त्याठिकाणी का गेला आणि त्याला वीजेचा झटका कसा लागला, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. फक्त ईमलीच नव्हे तर सोबत इतरही हिंदी आणि मराठी मालिकांचं, रिॲलिटी शोजचं शूटिंग फिल्म सिटीमध्ये होतं. 520 एकर जागेवर पसरलेल्या फिल्मसिटीमध्ये जवळपास 16 स्टुडिओ आणि 42 आऊटडोअर शूटिंग लोकेशन्स आहेत.
ईमली ही स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या यादीत ती सतत टॉप 5 मालिकांमध्ये असते. या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये मराठी अभिनेता गश्मीर महाजनी आणि सुंबुल तौकिर खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. नुकताच या मालिकेचा दुसरा सिझन संपुष्टात आला असून तिसऱ्या सिझनमध्ये नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे.