मुंबई : होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. लव रंजन दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांसाठी ही फ्रेश जोडी आहे, कारण रणबीर आणि श्रद्धा याआधी कोणत्याच चित्रपटात एकत्र झळकले नव्हते. त्यामुळे या दोघांमधील केमिस्ट्री कशी असेल, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. किंबहुना केमिस्ट्रीचं हेच गुपित आधीच उलगडू नये म्हणून दोघांनी वेगवेगळं चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. आता प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रणबीर-श्रद्धाच्या या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या चित्रपटाने 15.73 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातून निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्यासोबत डिंपल कपाडिया यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 8 मार्च रोजी हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला.
दिल्ली आणि गुजरातमध्ये या चित्रपटाची चांगली कमाई झाली. मात्र महाराष्ट्रात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये या चित्रपटाला आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्याचप्रमाणे धूळवडमुळे उत्तर प्रदेशातही कमी कमाई झाली. कमाईचा हा आकडा दुसऱ्या दिवशी आणखी वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
#TuJhoothiMainMakkaar does VERY WELL on Day 1… Got a boost due to #Holi festivities in several states, but lost out on substantial chunk of biz where #Holi was celebrated a day early [#Mumbai; working day]… Wed ₹ 15.73 cr. #India biz. pic.twitter.com/5Ggnczlfgk
— taran adarsh (@taran_adarsh) March 9, 2023
लव रंजनचे चित्रपट एकाच पठडीतील असले तरी प्रेक्षकांकडून त्यांना दमदार प्रतिसाद मिळतो. याआधी प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टिटू की स्विटी यांसारखे त्याचे रोमँटिक कॉमेडी चित्रपट हिट ठरले आहेत. रणबीर आणि श्रद्धासोबत मिळून आतासुद्धा त्याने अशीच काहीशी कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.
शाहरुख खानच्या पठाणसोबत आणि त्यानंतर प्रदर्शित झालेले चित्रपट फार दिवस थिएटरमध्ये टिकू शकले नाहीत. यात गांधी गोडसे, शहजादा, सेल्फी या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून राहिला. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड आपल्या नावे केल्यानंतर आता त्याच्या कमाईला ब्रेक लागणार असल्याचं दिसतंय.