मराठी मालिकांमधला चेहरा झळकला कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये
कबीर खान दिग्दर्शित आणि अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला 'चंदू चॅम्पियन' सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय. या चित्रपटात मराठी मालिकांमधील एका अभिनेत्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका आहे. भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या प्रेरणादायी संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्यासोबतच इतरही काही कलाकारांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या चित्रपटात एक मराठमोळं नाव आहे ते म्हणजे अभिनेता नितीन भजन याचं. सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ आणि ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकांमधील सुपरकॉप एसीपी भुषण शेरेकर हे पात्र सर्वांच्याच परिचयाचं आहे.
रुबाब झाडणारा, फुशारक्या मारणारा, भोसलेवर डाफरणारा शेरेकर ‘मोर’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ही पात्रं साकारणारा अभिनेता नितीन भजन हा सध्या बहुचर्चित बिग बॅनर चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’मध्ये राजाराम पेटकर म्हणजेच मुरलीकांत पेटकर (कार्तिक आर्यनच्या) यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतोय. अतिशय साधा, पोरासाठी जीव काढणारा, त्यासाठी त्यावर ओरडणारा, प्रसंगी हळवा होणारा बाप नितीनने उत्तम साकारल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहेत.
View this post on Instagram
एनएसडीमधून अभिनयाचे धडे घेतलेल्या नितीनने आत्तापर्यंत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘सुमी’मध्येही त्याची मध्यवर्ती भूमिका आहे. शिवाय ‘एण्ड टुमाँरो वी विल बी डेड’ या स्वीस चित्रपटातही त्याने काम केलंय. आगामी मराठी चित्रपट ‘मॅजिक’ आणि हिंदी चित्रपट ‘टु झिरो वन फोर’मध्येही त्याचं काम पहायला मिळणार आहे.
चंदू चॅम्पियनची कथा काय?
सांगली जिल्ह्यात इस्लामपूरमधील गावात जन्मलेल्या मुरलीकांत पेटकर या कमाल जिद्दी व्यक्तिमत्त्वाची कथा ‘चंदू चॅम्पियन’मध्ये पहायला मिळते. घराती बेताची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणात फारसा रस नसलेल्या मुरलीकांतने खेळात सुवर्णपदक जिंकायचं ही गाठ मनाशी बांधून कुस्तीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. कुस्तीत पारंगत झालेला हा तरुण एका प्रसंगामुळे सैन्यात दाखल झाला आणि थेट बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेत ऑलिम्पिक स्पर्धेत पोहोचला. मात्र 1962 च्या युद्धात नऊ गोळ्या अंगावर घेऊनही जिवंत राहिलेल्या पेटकर यांना अपंगत्व आलं. कमरेखाली पांगळे झालेले मुरलीकांत पॅरालिम्पिक खेळापर्यंत कसे पोहोचले आणि त्यांनी भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. हा खराखुरा संघर्षाचा प्रवास दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटात रंगवला आहे.