मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिझान खान याला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्महत्येच्या काही वेळेपूर्वी तुनिशाने शिझानशी बातचित केली होती, अशी माहिती वाळीव पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे शिझान तपासात सहकार्य करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर तुनिशाने शनिवारी आत्महत्या केली. याप्रकरणी तुनिशाच्या आईने अभिनेता शिझानविरोधात तक्रार केल्यानंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली. तुनिशा आणि शिझान एकाच मालिकेत काम करत होते. तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत वाळीव पोलिसांनी जवळपास 18 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
‘आरोपी शिझान खान हा तपासात पोलिसांना सहकार्य करत नाहीये. गळफास घेण्याआधी तुनिशा आणि शिझान यांच्यात संवाद झाला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं’, अशीही माहिती वाळीव पोलिसांनी दिली.
‘शिझान इतर महिलांसोबतही रिलेशनशिपमध्ये होता, असं पोलिसांनी कोर्टात म्हटलंय. त्यांनी याप्रकरणी सर्व अँगल्सने तपास करावा. शिझानशी भेट झाल्यानंतर तुनिशामध्ये बराच बदल झाला होता. तिने हिजाब परिधान करण्यास सुरुवात केली होती’, असं तुनिशाचे काका पवन शर्मा म्हणाले.
ज्या दिवशी तुनिशाने आत्महत्या केली, त्यादिवशी शिझानने त्याच्या ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’सोबत जवळपास एक ते दीड तास चॅट केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी शिझानच्या व्हॉट्स ॲप चॅट्सची तपासणी केली आहे. तुनिशासोबत असताना शिझानच्या आयुष्यात आणखी एक मुलगी होती, यावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केला आहे. शिझानच्या आयुष्यात असलेल्या दुसऱ्या मुलीचीही चौकशी पोलीस करू शकतात.
दरम्यान वाळीव पोलिसांनी शिझानचा ऑन-कॅमेरा जबाब नोंदवला आहे. जवळपास सात तास शिझानची ऑन कॅमेरा चौकशी झाली. या चौकशीदरम्यान तो सतत त्याचा जबाब बदलत असल्याचं पोलीस म्हणाले. करिअरवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तुनिशासोबत ब्रेकअप केल्याचं कारण त्याने या चौकशीदरम्यान सांगितलं. याआधी त्याने वयातील अंतर आणि धार्मिक मतमतांतरे यांमुळे ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं.