युरिन फ्लोमुळे त्रस्त असलेल्या अभिनेत्याने मांडली व्यथा; डायपर खरेदीसाठीही नाहीत पैसे
"असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं"; FIR फेम अभिनेत्याला आर्थिक मदतीची गरज, परिस्थितीपुढे झाला हतबल
मुंबई: एफआयआर, मे आय कम इन मॅडम, जीजा जी छत पर है यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते ईश्वर ठाकूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. कोरोना काळात त्यांच्या हातून काम केलं आणि त्यानंतर ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली व्यथा मांडली. ईश्वार यांना किडनीशी संबंधित समस्या होत्या. त्यामुळे युरिन फ्लोवर नियंत्रण न राहिल्याने त्यांना डायपरचा वापर करावा लागत आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे डायपर खरेदीसाठीही पैसे नसल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं.
“सुरुवातीला मी डायपरचा वापर करत होतो. मात्र आता माझ्याकडे इतकेही पैसे नाहीत की मी डायपर खरेदी करू शकेन. मी कागद किंवा रद्दी न्यूजपेपरचा वापर करतोय. आधी मी आयुर्वेदीक उपचार घेत होतो. मात्र आता तेसुद्धा बंद केलंय. कारण माझ्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीत”, असं ते म्हणाले.
घराच्या आर्थिक परिस्थितीविषयी सांगताना ते पुढे म्हणाले, “माझ्या घरी आई आणि भावाची समस्या इतकी आहे की मी स्वत:चा विचारदेखील करू शकत नाही. भावाला सिजोफ्रेनिया आहे. त्याच्या उपचारासाठीही पैसे भरू शकत नाहीये. गेल्या लॉकडाऊनपासून आई अंथरुणाला खिळून आहे. त्यांचीही मी मदत करू शकत नाहीये.”
View this post on Instagram
“मी ज्या मालिकांमध्ये काम केलं, तिथल्या कलाकारांनी आणि क्रू मेंबर्सनी माझी मदत केली. मात्र लॉकडाऊननंतर त्यांचीही आर्थिक परिस्थिती ठीक नाही. माझ्या आजारपणामुळे मी सध्या काम करू शकत नाहीये. अशा जगण्यापेक्षा मेलेलं बरं वाटतं. मात्र मी माझ्या भावाला आणि आईला एकटं सोडून जाऊ शकत नाही. 49 व्या वर्षी एखाद्यावर ओझं होणं काय असतं, हे माझ्यापेक्षा चांगलं कोणीच समजू शकत नाही”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.