Koffee With Karan: सारा-जान्हवीच्या एपिसोडवर प्रेक्षक नाराज; नेटकरी म्हणाले…
या एपिसोडचे रंजक प्रोमो आधी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यावर हा एपिसोड खूपच चांगला असेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाल्याचं दिसून येत आहे.
करण जोहरचा बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या चॅट शोचा सातवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील खास मैत्रिणी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) झळकल्या. आलिया-रणवीरचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना खूपच आवडला, तर सारा-जान्हवीच्या एपिसोडवरून नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. अनेकांनी हा एपिसोड खूपच कंटाळवाणा असल्याचं म्हटलंय. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा एपिसोड गुरुवारी रात्री प्रीमिअर झाला. या एपिसोडचे रंजक प्रोमो आधी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यावर हा एपिसोड खूपच चांगला असेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाल्याचं दिसून येत आहे.
सारा आणि जान्हवीने पहिल्यांदाच एकत्र या शोमध्ये हजेरी लावली होती. सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सारा ही विजय देवरकोंडाबद्दल आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलताना दिसली. जान्हवीनेही तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या. यावरून या एपिसोडमध्ये बरंच काही गॉसिप ऐकायला मिळेल असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांचा अपेक्षाभंग झाला.
View this post on Instagram
गुरुवारी संध्याकाळी एपिसोड पूर्ण संपण्याआधीच ट्विटरवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. ‘जानू आणि साराचा एपिसोड खूपच कंटाळवाणा आहे, किमान पहिली वीस मिनिटं तरी’, असं एकाने लिहिलं. तर ‘अरे देवा, फक्त पंधरा मिनिटं पाहून मला पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटलं. कॉलेजमधल्या मुली जशा एकमेकींशी गप्पा मारण्यात व्यग्र असतात, तसंच मला वाटलं. त्या दोघी शोमध्ये आल्या आहेत हे त्या विसरल्या का?’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘हे तिघं नेमकं काय बोलतायत, त्यातलं मला अर्ध पण समजलं नाही’, असं एकाने लिहिलं. या एपिसोडमध्ये अनेकदा सारा आणि जान्हवी एकमेकींशी कुजबुजत असतात आणि हीच गोष्टी प्रेक्षकांना खूप खटकली. त्या दोघी नेमकं काय कुजबुजत आहेत, हेच प्रेक्षकांना कळत नव्हतं.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
त्या दोघींचे विनोद फक्त करण जोहरलाच समजत होतो, असंही काहींनी म्हटलं. संपूर्ण एपिसोडमध्ये फक्त गोंधळ होता, सगळेजण एकाच वेळी बोलत होते, प्रेक्षकांना मात्र त्यातलं काहीच समजत नव्हतं, असेही कमेंट्स ट्विटरवर येऊ लागले आहेत.