मुंबई: लोकशाहीर कुंदन कांबळे यांनी अनेक लोकप्रिय लोकगीते, कोळीगीते आणि भीम गीते लिहिली. असंख्य कार्यक्रम केले. असंख्य कॅसेटमध्ये त्यांची गीते आली. परंतु, दोन घटना त्यांच्या आयुष्यात अत्यंत संस्मरणीय ठरल्या. त्यातून त्यांना बरंच काही शिकायला मिळालं. काय होत्या या घटना? कुंदनदादांनी सांगितलेल्या या घटना वाचा जशाच्या तशा… (unforgettable memories of shahir kundan kamble)
बाबासाहेब जिंदाबाद
गीत लेखन, गाण्याचे कार्यक्रम याला कुंदन कांबळे यांच्या घरच्यांनी कधीच विरोध केला नाही. उलट घरची काळजी करू नका, छंदाला जीव लावा, असं त्यांच्या पत्नीनं स्पष्ट केलं होतं. घरातूनच मोकळीक मिळाल्याने त्यांनीही मग लिहिणं आणि गाणं यावर भर दिला होता. बरीच गाणी लिहिल्यानंतर स्वत:च्या गाण्यांच्या दोन कॅसेट काढण्याची त्यांची इच्छा होती. ‘भीम गौरव’ आणि ‘बाबासाहेब जिंदाबाद’ या दोन कॅसेट त्यांना काढायच्या होत्या. त्यासाठीची सर्व जुळवा जुळव झाली होती. परंतु पैशा अभावी दोन्ही कॅसेट रखडल्या होत्या. तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्यासाठी धावून आली. कुंदनदादांच्या पत्नीने अंगावरचे सर्व दागिने मोडून पैसे दिले. या कॅसेटमधून त्यांना फारसा फायदा झाला नाही. मात्र, मुद्दल मिळाली. पण फायद्यापेक्षाही आत्मिक समाधान खूप मोठं होतं, असं कुंदनदादा सांगायचे.
दोन दिवस आले नाही, घरात आकांडतांडव
दुसरा किस्साही असाच आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे एकदा कुंदनदादांच्या ऑफिसला आले आणि त्यांना गोरेगावला कार्यक्रमाला घेऊन गेले. प्रल्हाद शिंदे यांचा गायिका रंजना शिंदे यांच्यासोबत कव्वालीचा सामना होता. कार्यक्रम संपला. कुंदनदादा सकाळी घराकडे जायला निघाले. पण कुंदनदादांना सोडतील ते प्रल्हाद शिंदे कसले? त्यांनी कुंदनदादांना उरणला कार्यक्रमाला जायचं म्हणून सांगितलं. तिथेही रंजना शिंदेंबरोबरच कार्यक्रम होता. परंतु, आपण कुठे आहोत? कुठे जातोय? याची खबर कुंदनदादांनी घरी दिली नव्हती. शिवाय त्याकाळी मोबाईल नव्हते. आणि फोन ही केवळ श्रीमंतांची हौस होती. शेजारी कुणाच्याही घरी फोन नव्हता. त्यामुळे घरच्यांना निरोप देण्याचा काहीच मार्ग नव्हता. प्रल्हाद शिंदे यांच्या आग्रहामुळे ते उरणला गेले. इकडे कुंदनदादांच्या घरी रडारड सुरू झाली. दोन दिवसांपासून दादा घरी गेले नव्हते. त्यामुळे घरचे लोक घाबरले होते. घरच्यांच्या मनात नको नको त्या कल्पना येत होत्या. त्यांच्या भावाने रेल्वेची सर्व रुग्णालये पायाखाली घातली. पण काहीच थांगपत्ता लागला नाही. इकडे घरच्या मंडळींचे रडून रडून हाल झाले होते. घरात सुतकी वातावरण निर्माण झालं होतं.
घरात शिरले अन्
घरी असं काही होईल याची कुंदनदादांना कल्पनाही नव्हती. दोन दिवसानंतर 10 किलो तांदूळ खांद्यावर घेऊन ते चाळीतून घराकडे येऊ लागले. तेव्हा चाळीतील लोक त्यांच्याकडे आ वासून पाहत होते. लोक आपल्याकडे असे का पाहत आहेत याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आपल्याच तंद्रीत त्यांनी घरात प्रवेश केला. तेव्हा प्रेताला जमावी तशी गर्दी घरात झाली होती. सर्व सुतकी चेहऱ्यांने बसले होते. घरात गेल्यावर त्यांना झाल्या प्रकाराची कल्पना आली आणि त्यांनी घरच्यांना सर्व प्रसंग कथन केला. परंतु, घरच्यांचे हाल पाहून ते पुरते हादरून गेले होते. त्यानंतर त्यांनी घरी वेळेवर जाण्याचा निर्धार केला, तो शेवटच्या क्षणापर्यंत पाळला होता.
कुंदनदादांची गाजलेली आंबेडकर गीते
लागला अचानक एका हंसाला बाणं,
धरणीवर कोसळला जीव तो हैराणं,
थरथरतो, धडपडतो स्व वाचवाया प्राणं,
तळमळतो, विव्हळतो जीव तो लहानं,
हंस हा कुणाचा… हंस हा कुणाचा…
आणि
बुद्ध चरणाची बाई, पहाते मी वाटं,
रोहिणीचे पाणी बोले, रोहिणीचा काठं…
आणि
धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा,
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना,
वंदना.. वंदना.. वंदना…
आणि
म्हण बिट्या म्हण, जयभीम म्हण,
जयभीमपाई तुझे उजळे जीवन… (साभार, आंबेडकरी कलावंत) (unforgettable memories of shahir kundan kamble)
संबंधित बातम्या:
‘तुझा खर्च लागला वाढू, सांग कितीदा कर्ज काढू…’ हे गाणं तुम्ही आजही गुणगुणता; कुणी लिहिलंय माहित्ये?
संगीतकार पाठक म्हणाले, कसले कवी?, चार ओळी लिहिता येत नाही? आणि ‘हे’ लोकप्रिय गाणं जन्माला आलं
‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय…’ हे गाणं कुणी लिहिलं? कुठे सूचलं माहीत आहे का?
(unforgettable memories of shahir kundan kamble)