किती हा अहंकार.. रणबीर पापाराझींवर भडकताच नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
अभिनेता रणबीर कपूरने 'ॲनिमल' या चित्रपटाच्या यशानंतर 8 कोटी रुपयांची नवी आलिशान कार खरेदी केली आहे. या कारने प्रवास करतानाचा रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पापाराझींवर चिडल्याचं दिसून येतंय.
अभिनेता रणबीर कपूरने नुकतीच आलिशान कार खरेदी केली. बेंटली काँटीनेंटल जीटी व्ही 8 असं या कार मॉडेलचं नाव असून ती तब्बल आठ कोटी रुपयांची आहे. ही नवी कार विकत घेतल्यापासून रणबीर त्यामधूनच प्रवास करताना दिसतोय. पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोमवारी पहाटे रणबीर पुन्हा एकदा त्याच्या कारने प्रवास करताना दिसला. यावेळी ड्राइव्हर त्याची कार चालवत होता आणि तो पॅसेंजर सीटवर बसला होता. रणबीरला पाहताच पापाराझी त्याच्या दिशेने धावून गेले. त्याच्या कारभोवती पापाराझींनी घोळका केला, तेव्हा रणबीर त्यांच्यावर चिडलेला दिसला. रणबीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘सेलिब्रिटींना कधीतरी एकटं सोडा’, असं एकाने लिहिलं. तर ‘अशाने अपघात होऊ शकतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी रणबीरच्या चिडण्यावरूनही कमेंट्स केल्या आहेत. ‘एखादा चित्रपट चालला की यांना अहंकार येतो’, अशा शब्दांत काही युजर्सनी टीका केली आहे. शनिवारी रात्री रणबीर त्याची पत्नी आलिया भट्टसोबत या नव्या कारने प्रवास करताना दिसला. नवविवाहित रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या घरी ते गेले होते. यावेळी रणबीर काळ्या रंगाचा शर्ट-ट्राऊजर्स अशा फॉर्मल लूकमध्ये दिसला. तर आलियाने लाल रंगाचा वनपीस घातला होता. यावेळी रणबीरने पापाराझींसोबत मस्करीसुद्धा केली होती. “आता कारमध्येच येऊन बसा”, असं तो पापाराझींना म्हणाला होता.
View this post on Instagram
गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीत पापाराझी कल्चर खूप वाढलंय. एअरपोर्ट, रेस्टॉरंट, हॉटेल, जिम, सलून अशा विविध ठिकाणी सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले जातात. सतत पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर अनेकदा सेलिब्रिटींना भडकतानाही पाहिलं गेलंय. अनुष्का शर्मा आणि आलिया भट्टने याआधी अशा पापाराझींविरोधात संताप व्यक्त करत पोस्ट लिहिली होती. नुकतंच ‘बिग बॉस 17’ फेम आयेशा खाननेही पापाराझींबद्दल एक पोस्ट लिहिली होती. सेलिब्रिटींचे व्हिडीओ चुकीच्या पद्धतीन झूम करून ते सोशल मीडियावर अपलोड केले जातात, अशी तक्रार तिने या पोस्टमध्ये केली होती.